छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी ४००-५०० जणांवर गुन्हा दाखल, एक जण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी ४००-५०० जणांवर गुन्हा दाखल, एक जण ताब्यात

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या किराडपुरा भागात बुधवारी रात्री दोन गटांत वाद झाला. या वादानंतर काही वेळातच या परिसरात दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली. यावेळी जमावातील काही लोकांनी पोलिसांच्या वाहनांसह १५ खासगी वाहने देखील जाळली. या घटनेनंतर जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा सुद्धा वापर केला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या राड्याप्रकरणात पोलिसांनी ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिनसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, दंगा भडकवणे, पोलिसांवर हल्ला करणे या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागांत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, “छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझी विनंती आणि आवाहन आहे की इतके वर्षे आपण सण आनंदाने साजरे करतो. आत्ताही शांतता राखा आणि उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे,” असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे आज (ता. ३० मार्च) दुपारी गुजरात येथील वडोदरा शहरात रामनवमीच्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तर इतर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आल्याने या भागाला छावणीचे स्वरुप आले आहे.


हेही वाचा – अमृतपाल सिंगने मागणी केली ती ‘सरबत खालसा’ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

First Published on: March 30, 2023 6:12 PM
Exit mobile version