काँग्रेस आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल; आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं पडलं महागात

काँग्रेस आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल; आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं पडलं महागात

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी घडला. मात्र वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करणं काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांना चांगलंच महागात पडल्याचे समोर आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोन वरून धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणेदार सत्यजित बंडेवार यांनी सांगितले आहे.

असा घडला प्रकार

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी सोमवारी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार नोंदवली.

आमदार कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. डवले यांनी केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनं संताप व्यक्त केला आहे. संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं.

First Published on: May 11, 2021 9:02 AM
Exit mobile version