नाशिक शहरातील या रस्तावरुन प्रवास करताना सावधान!

नाशिक शहरातील या रस्तावरुन प्रवास करताना सावधान!

नाशिक शहरात लॉकडाऊन शिथील झाल्यापासून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. अपघात ठिकाणी तात्पुरती डागडुजी केली जात आहे. मात्र, कायमस्वरुपी प्रश्न सुटत नसल्याने आरटीओ कॉर्नर सिग्नल आणि तारवालानगर सिग्नल अपघाताला आमंत्रण देत आहेत. या दोन्ही ठिकाणी दररोज अपघात होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना सिग्नल ओलांडणे धोकादायक झाले आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही भरमसाठ वाढत आहे. त्यामुळे रस्ते अपघात हा दररोज चिंतेचा विषय झाला आहे. अपघाताचा ठपका नेहमी वाहनचालकावरच ठेवला जातो. चालकांच्या भयंकर चुकीमुळेच अपघातात होतात, असे नाही तर अनेक अपघात नागरिकांच्या सामान्य चुकांमुळे व सदोष मनुष्यव्यवस्थेमुळेसुद्धा होतात. अपघात रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकवेळी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टळू शकतात व अपघातग्रस्तांचा जीवही वाचू शकतो.

पेठ रोडवरील आरटीओ कॉर्नर सिग्नलवर शनिवारी (दि.१०) मीठ आणि साखरेची वाहतूक दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला. अपघातानंतर सिग्नलचा खांब तुटला. अपघातामुळे सिग्नल यंत्रण बंद पडली. भीषण अपघात होऊन शनिवारी व रविवारी सिग्नल यंत्रणा संबंधित विभागाने पूर्ववत केली नाही. त्यामुळे या चौकातून ये-जा करणार्‍या वाहनचालकांसह प्रवाशांना जीव मुठीत धरुन जावे लागल्याचे दिसून आले. आरटीओ कॉर्नर सिग्नल पूर्ववत करण्यासह चौकात वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

First Published on: July 12, 2021 3:32 PM
Exit mobile version