पुढील ६ महिन्यात राज्यातील सर्व तुरुंगात सीसीटीव्ही लागणार

पुढील ६ महिन्यात राज्यातील सर्व तुरुंगात सीसीटीव्ही लागणार

राज्यातील तुरुंगात कैद्यांना मोबाईलपासून गांजा, शस्त्र मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. तुरुंगात नेमके काय घडते? याची पाहणी करण्यासाठी पुढील सहा महिन्यात राज्यातील सर्व तुरुंगांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अद्ययावत यंत्रणा बसवणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. राज्यातील तुरुंगात एकही ब्लँक स्पॉट राहू नये, यासाठी ८९ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी तुरुंगातील कैद्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना देशमुख यांनी तुरुंगात प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी केपीएमजीचा अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यानुसार कारागृहात अद्ययावत यंत्रणा उभी करू असे सांगितले.

‘मी स्वत: येरवडा कारागृहात १ महिना काढलाय’

यावेळी, चर्चेदरम्यान माजी गृहराज्यमंत्री आणि भाजपचे आमदार रणजीत पाटील यांनी उपप्रश्न विचारत आजवर पुण्याच्या येरवडा तुरुंगात सीसीटीव्ही लावणे शक्य झाले नसल्याबाबत गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले. इस्रायलच्या धर्तीवर राज्यातील तुरुंग अद्ययावत करणार का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. तर शेकापचे जयंत पाटील यांनी, मी स्वतः येरवडा तुरुंगात एक महिना काढला असून तेथील कैद्यांना हवी ती गोष्ट मिळत असल्याचे सांगितले.

तुरुंगात सीसीटीव्ही यंत्रणा लागल्यानंतर तिथे जर एखादी प्रतिबंधित वस्तू येत असेल तर ते निदर्शनास येईल, असे उत्तर देशमुख यांनी दिले. तसेच सध्या तुरुंगात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून झडती घेण्यात येते. तसेच हॅन्ड मेटल डिटेक्टर, डोनर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि कारागृहामध्ये मोबाईल जॅमर बसवण्यात आले असल्याचे देखील त्यांनी लेखी उत्तरात सांगितले.

First Published on: March 12, 2020 5:36 PM
Exit mobile version