गणेशोत्सव साजरा करा, पण निर्बंध पाळा : भुजबळ

गणेशोत्सव साजरा करा, पण निर्बंध पाळा : भुजबळ

जिल्हयात कोरोना रूग्णांची वाढती संख्या, सण, उत्सवांच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागल्याने संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर पुन्हा निर्बंध लादले जाणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. मात्र गणेशभक्तांनी राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानूसार कोरोना नियमांचे पालन करत सण, उत्सव साजरे करावे असे आवाहन करत जिल्हयात कोणतेही नवे निर्बंध लागू केले जाणार नाही असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ सण, उत्सवांच्या पार्श्वभुमीवर वाढती गर्दी लक्षात घेता राज्यात कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात होणार्‍या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोलतांना भुजबळ म्हणाले की, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठे गर्दी होते, कुठे बंदोबस्त आवश्यक आहे याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर भक्तांमध्ये उत्साह आहे हे आम्ही समजू शकतो. उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही. प्रशासनाकडून गणेश मंडळे, मुर्ती विक्रेते तसेच भाविकांना सहकार्य केले जाईल. कोणाच्याही भक्तीच्या आड आम्ही येणार नाही परंतू कोरोना नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करतांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोणतेही नविन निर्बंध लादणार नाही असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाने दिलेल्या नियमानूसारच गणेशोत्सव साजरा करण्यावेही आवाहनही त्यांनी केले.

स्थिर रूग्णसंख्या ठरतेय डोकेदुखी
यावेळी भुजबळ म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या १०७६ इतकी होती. ३ सप्टेंबर रोजी ९८७ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. महिनाभरात कोरोना रूग्णसंख्या अवघी १०० ने कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे नागरीकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी दर २.८ टक्के तर मृत्यु दर २.११ टक्के इतका आहे. म्युकर मायकोसिसचे रूग्णही कमी होत असून सद्यस्थितीत २७ रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हयात २६ लाख ४२ हजार ३३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

४५० मेट्रीक टन ऑक्सिजनची सज्जता
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर ऑक्सिजनची सज्जता ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यानूसार जिल्हयाला दिलेल्या ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन उदिदष्टांपैकी ३५० मेट्रीक टन ऑक्सिजनची सज्जता करण्यात आली आहे. शहरात २२ पीएसए प्लांन्ट कार्यान्वित करण्यात येणार असून यापैकी १३ प्लांन्ट सुरू करण्यात आले आहेत. ९ प्लांन्टचे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामीण भागात २४ पीएसए प्लांन्ट बसविण्यात येणार आहे त्यापैकी ५ प्लांन्ट सुरू करण्यात आले आहेत. तसेच सप्टेंंबर अखेर ऑक्सिजन टँकही उपलब्ध होणार असल्याने जिल्हयात ४५० मेट्रीक टन ऑक्सिजनची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: September 4, 2021 3:25 PM
Exit mobile version