महाडमध्ये रंगपंचमी साजरी

महाडमध्ये रंगपंचमी साजरी

Mahad Rangpanchami

तालुक्यात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी झाली. रंगांची उधळण करीत लहानांपासून थोरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. अनेक गावात पालख्या निघाल्या. ढोलताशा, खालूबाजाच्या तालावर नृत्य करत रंगपंचमीचा आनंद सर्वांनीच घेतला.होळीच्या पाच दिवसांनी कोकणात सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जाते. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही जपली गेली आहे. महाड शहरातदेखील रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी 12 वाजल्यापासूनच लहान मुले आळी आळीतून रंगांच्या पिचकार्‍या हातात घेऊन उभे राहिली होती. शिवाय अनेक ठिकाणी डीजे, ढोल ताशावर नृत्य करत एकमेकांना रंग लावला जात होता. यामुळे दुपारनंतर महाड बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला.

जवळपास सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली असली तरी लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरात रंगपंचमी साजरी करताना फुगे फोडण्यास बंदी असली तरी अनेक ठिकाणी फुगे फोडताना लहान मुले दिसत होती. नैसर्गिक रंगाकडेही अनेकांचा कल दिसून येत होता. शहरात रंगपंचमी खेळत असताना एक युवक शॉक लागून जखमी होण्याची घटना वगळता अन्य ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी झाली.

धार्मिक कार्यक्रमांनी तालुक्यातील अनेक गावात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. पाच दिवसांनी सहाणेवर बसलेला देव त्याच्या मूळ मंदिरात पालखीतून नेला जातो. शिवाय खालू बाजाच्या तालावर काठ्या नाचवल्या जातात. महाड तालुक्यातील या धार्मिक उत्सवाला गावातील लहान थोर सामील झाले होते. रंगपंचमीला ग्रामीण भागात एक विशेष महत्व असते. विशेषतः ग्रामीण भागात नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येतो. ग्रामीण भागात उत्साह आणि आनंदात रंगपंचमी साजरी झाली.

First Published on: March 26, 2019 4:02 AM
Exit mobile version