लसीकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार

लसीकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या लसीकरणाची लोक आतुरतेने वाट पाहत असताना यात होणार्‍या विलंबाला सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करणार्‍या भारतात सध्या तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचाच बोजवारा उडाल्याने लसींसाठी रात्र जागून काढणार्‍यांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. आता या दोषाला सीरमने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

१ मे पासून देशभरात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी जाहीर करण्यात आलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यातील अडचणीच दूर होण्याचे नाव घेत नाही. देशभर सर्वत्र लशीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने जाहीर करण्यात आलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण होता होत नाही. या तुटवड्यामुळे अठरा वर्षांवरील नागरिकांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. या लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्रावर शरसंधान केले आहे. लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर विचार न करताच 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची घोेषणा करण्यात आल्याचे संचालकांनी स्पष्ट केले.

भारतात किती लशी शिल्लक आहेत आणि याबाबत आरोग्य संघटनेच्या काय गाइडलाइन्स आहेत, हे जाणून न घेताच सरकारने अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची घोषणा का केली, असा प्रश्न कार्यकारी संचालकांनी केला अहे. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच लसीकरणाबाबत धोरण ठरवायला हवे होते. मात्र, त्याआधीच घोषणा झाल्याने गोंधळ उडाल्याचे सुरेश जाधव यांनी स्पष्ट केले. आलेल्या आपत्तीतून आपण धडा घेतला पाहिजे होता. एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे.

लसीकरण ही कोरोनाच्या समूळ उच्चाटनाचे एकमेव कारण आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. लस घेतली की खुशाल वावरण्याचा हा परिणाम असल्याचे जाधव म्हणाले. लस घेतली की नियम सोडून वागता येत नाही. यासाठी कोरोनाचे नियम पाळावेच लागतील, असे कार्यकारी संचालकांनी बजावले.

आतापर्यंत 19.32 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या 126 व्या दिवशी लसीचे 13,83,358 डोस देण्यात आले. शुक्रवारी 18-44 वयोगटातील 6,63,353 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला. लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यात आतापर्यंत सर्व राज्यांमध्ये मिळून या वयोगटातील 92,73,550 लाभार्थ्यांना लस दिली गेली आहे.

गाईडलाईनशिवाय लसीकरण अयोग्य
आपल्या देशातील लसींची उपलब्धता आणि जागतिक आरोग्य संघटनेचे नियम यांची सांगड घालायला हवी होती. संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करून अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची घोषणा केंद्राने करणेच अयोग्य होते. नियमांकडे दुर्लक्ष करून लसीकरणाची घोषणा झाल्याने गोंधळ उडाला.
-सुरेश जाधव, कार्यकारी संचालक,सीरम इन्स्टिट्यूट

First Published on: May 23, 2021 5:40 AM
Exit mobile version