केंद्रीय मंत्र्याची मुलगीच काढणार सरकारविरोधात मोर्चा, भाजपची भूमिका काय?

केंद्रीय मंत्र्याची मुलगीच काढणार सरकारविरोधात मोर्चा, भाजपची भूमिका काय?

 

औरंगाबादः भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली येत्या मंगळवारी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे नियोजन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण या मोर्चाला शिंदे-भाजपचे सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कन्नड-सोयगाव तालुक्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. संजना जाधव यांच्या नेतृत्त्वात प्रथमच मोर्चा निघत असल्याने याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या नेतृत्त्वात निघणारा मोर्चा ही निवडणुकीची तयारी असल्याचेच बोलले जात आहे. पिशोर नाक्यापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. असे असताना केंद्रीय मंत्र्याची मुलगीच सरकारविरोधात मोर्चा काढत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत १५ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या बंधाऱ्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा करावेत. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीच लाभ द्यावा, अशा मागण्या मोर्चात करण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात यावा.  कापूस, ऊस. मका, सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा यासह विविध मागण्या  मोर्चात करण्यात येणार आहे. या मोर्चाला शेतकरी, महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे, असे आवाहन संजना जाधव यांच्या समर्थकांनी केले आहे.

या मोर्चाला गर्दी जमवण्याचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बांधणी सुरु केली आहे. हा मोर्चा यशस्वी झाल्यास भाजप विरुद्ध भाजप असा नवीन वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष लागले आहे.

First Published on: February 18, 2023 6:43 PM
Exit mobile version