मध्ये रेल्वेने २४ तासांत पोहोचवली रुग्णापर्यंत औषधं! कर्करुग्णासाठी ठरली तारणहार!

मध्ये रेल्वेने २४ तासांत पोहोचवली रुग्णापर्यंत औषधं! कर्करुग्णासाठी ठरली तारणहार!

मध्य रेल्वेच्या कारभारावर अनेकदा टीका केलेली आपण ऐकली असेल. पण कोरोनाच्या या संकटकाळात मध्य रेल्वे बजावत असलेली भूमिका अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एकीकडे रेल्वेच्या मदतीने ठिकठिकाणी अडकलेल्या लाखो मजुरांना आपल्या घरी परतण्याची आशा निर्माण झाली असतानाच रेल्वेमुळे अनेक रुग्णांना वेळेवर औषधं उपलब्ध होत असल्यामुळे अनेक रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मध्य रेल्वेचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांच्यासाठी मध्य रेल्वे तारणहार बनून आल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. अशीच एक घटना सोलापुरात घडली आहे. मिळालेल्या प्रतिसादामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट ट्वीटरवर मध्य रेल्वेचे मनापासून आभार मानले आहेत.

नक्की झालं काय?

तर झालं असं, की ११ मे रोजी सोलापुरात राहणाऱ्या सुशील पाडी यांचे वडील रक्ताच्या कर्करोगामुळे ग्रस्त असलेले नौदल कर्मचारी आहेत. ते त्यांच्या मूळ गावी सोलापुरात गेले होते. पण लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे ते परत येऊ शकले नाहीत. रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी त्यांच्या वडिलांना आवश्यक असलेली औषधे जलदगतीने आवश्यक आहेत, हे समजून घेतल्यानंतर सुशील पाडी यांनी @Cendral_Railway ट्विटर हँडलवर ट्वीट करुन मदत मागितली.

पाडी यांनी केलेलं ट्वीट तातडीने @drmmumbaicr वर पाठवले गेले. परिस्थितीची निकड समजून घेत मुंबई विभागाच्या टीमने यावर लगेच कारवाई केली. वाणिज्य निरिक्षक (पार्सल) जितेंद्र मिश्रा यांनी पार्सल लिपिक उत्तम दास यांच्या सहकार्याने पाडी यांच्या निवासस्थानी औषधे पाठवली. गरजू रूग्णाला औषध उपलब्ध व्हावे म्हणून ते पार्सल त्वरीत नियोजित विशेष पार्सल ट्रेनद्वारे सोलापुरात नेण्यात आले. रेल्वेने यावर त्वरीत कार्यवाही केल्याने सुशील पाडी आश्चर्यचकित झाले आणि जलद प्रतिसाद मिळाल्याबद्दल आणि २४ तासांत औषध पोहोचवल्याबद्दल रेल्वेचे आभार मानले. “जलद प्रतिसाद मिळाल्याबद्दल रेल्वेचे तसेच श्री. जितेंद्र मिश्रा आणि उत्तम दास (सीएसएमटी पार्सल कार्यालय) यांच्या विलक्षण पाठिंब्याबद्दल विशेष उल्लेख” असे नमूद करून पाडी यांनी रेल्वेचे आभार मानले आहेत.

First Published on: May 19, 2020 12:00 AM
Exit mobile version