राज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष, NDRFच्या २६ टीम, ४ हेलिकॉप्टर्स, लष्कर दाखल

राज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष, NDRFच्या २६ टीम, ४ हेलिकॉप्टर्स, लष्कर दाखल

राज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष, NDRFच्या २६ टीम, ४ हेलिकॉप्टर्स, लष्कर दाखल

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. सकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी सुद्धा मदतकार्यात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने केल्या जात असलेल्या मदतीची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविल्या आहेत.

रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना २ लाख रूपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केली आहे. चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल होऊन मदतकार्य करीत आहे. एनडीआरएफच्या २६ चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-१७, दोन सी-१३० तसेच एक एमआय-१७ हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक ४ चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात ३, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी २, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी १ चमू तैनात आहे. कोलकाता आणि बडोदा येथून प्रत्येक ४ चमू येत आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दरम्यान, शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि पिण्याचे पाणी तसेच अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या भागात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निरंजन डावखरे हे सुद्धा सातत्याने प्रवासात आहेत. त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थितीची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जात आहे. या पाऊस आणि पुरात तसेच भूस्खलनाच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखत प्रशासनाने अधिक गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. तळिये गावांत मृतदेह बाहेर काढण्याचे काम गावकर्‍यांना करावे लागले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

First Published on: July 23, 2021 9:43 PM
Exit mobile version