नाशिक शहराचे शतक; जिल्हा हजाराच्या उंबरठ्यावर

नाशिक शहराचे शतक; जिल्हा हजाराच्या उंबरठ्यावर

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

नाशिक जिल्ह्यासह नाशिक शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, सोमवारी (दि.२४) दिवसभरात २१ नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आठ दिवसांपुर्वी शहरात ४७ बाधित रुग्ण होते. ती संख्या आता दुपटीने वाढली असून ११५ वर पोहचली आहे. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या ५३ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा रिपोर्ट येण्याआधीच मृत्यू झाला आहे. पंचवटीत एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याचा शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मृत कर्मचारी आजारी असताना उपचारासाठी विविध ठिकाणी भेट देत होते. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण 983 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

नाशिक शहरात आठ दिवसांत दुप्पट रुग्ण पॉझिटिव्ह
तारीख नाशिक शहर मालेगाव शहर
18 मे -47-619
19 मे- 48-648
20 मे -48-665
21 मे -51-673
२२ मे -56 -685
२३ मे -69 -685
२४ मे -78 -696
२५ मे -११५- ६९१

अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

पेठरोडवरील रुग्णाचा करोनामुळे मृत्यू
पेठरोडवरील मृत व्यक्तीस ताप, घशात दुखणे व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 21 मे रोजी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पूर्वीपासून मधुमेहाचा विकार होता. तसेच रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सहाशेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले, म्हणून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 22 मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी (दि.24) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने पूर्ण प्रयत्न करूनही सोमवारी त्यांचे निधन झाले.

पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कर्मचार्‍यास मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारार्थ आडगांव येथील डॉ. वंसतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होेते. ते पोलीस मुख्यालय येथे राहण्यास होते. सोमवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कर्मचार्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचार्‍याचा करोनामुळे मृत्यू
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याचा नाशिक शहरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. ते नाशिक शहरातील रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे, मृत कर्मचारी आजारी असल्याने उपचारासाठी विविध ठिकाणी भेट देत होते. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. ते अंबोली आरोग्य केंद्रात सुपरवायझर पदावर कामाला होता. ते एक महिन्यापासून आजारी असल्याने कामावर येत नव्हते. ते ११ मे रोजी अंबोली आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांकडे वैयक्तीक कामासाठी आले होते. त्यामुळे अंबोली आणि परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच ते त्र्यंबकेश्वर शासकीय कार्यालयात गेल्याची चर्चा आहे.

अंत्यविधीसाठी उल्हानगर प्रवास
जेलरोड येथील रहिवाशी ४५ वर्षीय महिला वडिलांच्या अंत्यविधीसाठी उल्हासनगर येथे गेली होती. त्या महिलेचा स्वाब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून महापालिकेने महिला राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

मार्केटयार्डमधील कामगार बाधित
मखमलाबादनाका परिसरातील क्रांतीनगर येथे २३ वर्षीय पुरुष मार्केटयार्ड, नाशिक येथे कामास आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यास कोरोनाची लागण झाली आहे. मार्केटयार्डमधील भाजीपाला व्यापारी व हॉटेलचालक कोरोनाबाधित आहेत. खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य पथकाने त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे.
विसेमळा येथील पोलिसांमुळे तिघे पॉझिटिव्ह
कॉलेज रोड भागातील विसे मळा येथील रहिवासी पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. ते मालेगावात बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांच्या कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, २३ व १७ युवती आणि १५ वर्षीय मुलाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते तिघेही बाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे.

रामनगरमधील मृत रुग्णाची पत्नी पॉझिटिव्ह
रामनगर पेठरोड येथील कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असताना साखरेचे प्रमाण जास्त असल्याने उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा सोमवारी (दि.२५) मृत्यू झाला. मृत रुग्णाची ३२ वर्षीय पत्नीचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे.

टॅक्सीचालकाची पत्नी पॉझिटिव्ह
पंडितनगर, सिडको येथील टॅक्सीचालक रुग्णाच्या संपर्कातील २६ वर्षीय पत्नी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्याच्या सपर्कातील २ वर्षीय मुलगासुद्धा बाधित आहे. टॅक्सीचालक कसारा ते नाशिक प्रवासी वाहतूक करायचा. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली आहे.

आरोग्यसेवकाचे मालेगाव कनेक्शन
गोविंदनगर येथील ३० वर्षीय आरोग्य सेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते मालेगाव येथे आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या राहत्या घराची इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

वडाळ्यात ६ जण पॉझिटिव्ह

मुमताजनगर, वडाळ्यात आढळून आलेला पहिल्या रुग्णाचे पिंपळगाव ते मुंबई येणे-जाणे होते. ते कांदा वाहतूक करायचे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील १६, ७६ व ४२ वर्षीय पुरुष आणि १५ व १८ वर्षीय मुलींचा समावेश आहे. सोमवारी पुन्हा बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने १५ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अन्नदान करताना बाधित रुग्णाचा संपर्क

नाशिकरोड आशीर्वाद बसस्टॉप परिसरातील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ते परप्रांतात जाणार्‍या मजुरांना अन्नदान वाटप करायचे. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

First Published on: May 25, 2020 8:56 PM
Exit mobile version