साखर कारखान्याच्या अध्यक्षाची आत्महत्या

साखर कारखान्याच्या अध्यक्षाची आत्महत्या

गोळी झाडून आत्महत्या

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर (४५) यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. निंबाळकर हे रिव्हॉल्वर साफ करत होते. यादम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. रिव्हॉल्वर साफ करताना चुकून गोळी झाडली गेल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. गोळीचा आवाज येताच त्यांच्या कुटुंबियांनी जावून पाहिले तर निंबाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने बारामती येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वीच झाली होती निवड

निंबाळकर यांची पाच दिवसांपूर्वीच अर्थात ३१ ऑक्टोबरला बिनविरोध निवड झाली होती. या विजयानंतर निंबाळकरांनी अक्षरश: जेसीबीने गुलाल उधळून आनंदोत्सवही साजरा केला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह इंदापूर व बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. निंबाळकर यांच्या पश्चात पत्नी, वडील, एक मुलगा, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे. इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार शिंदे करत आहे.छत्रपती साखर कारखान्यातील कंत्राटी कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला होता. निंबाळकरांनी कामगारांशी बैठक घेऊन आजच हा संप मिटविला. परंतु, कामगारांना बोनस देण्याच्या मुद्‌द्‌यावर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांशी निंबाळकरांचे मतभेद झाले होते. तेव्हापासून निंबाळकर तणावात होते. त्यामुळे निंबाळकर यांनी गोळी झाडून आत्महत्या तर केली नाही ना, अशीही चर्चा सुरु आहे.

 

First Published on: November 5, 2018 10:19 PM
Exit mobile version