पुण्यात तिरंगी लढतीमुळे काँग्रेससमोर आव्हान

पुण्यात तिरंगी लढतीमुळे काँग्रेससमोर आव्हान

पुण्यात भाजपने गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी देऊन ब्राह्मण चेहरा देत भाजपवर मात केली. मात्र वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. परंतु यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने या ठिकाणी काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले आहे.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बर्‍यापैकी पुण्यात राजकीय प्रस्थ निर्माण केले आहे. पुण्यातील भाजपचा चेहरा म्हणून बापट यांची ओळख निर्माण झालेली आहे. पुण्यातील बहुतांश भागातील मतदार आणि विविध सामाजिक संस्था यांच्याशी बापट यांचा असलेला थेट संपर्क हेच बापट यांचे शक्तीस्थान बनले आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव, शिवाजीनगर, कोथरूड, पार्वती, पुणे कॉन्टमेंट आणि कसबा पेठ अशा सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्वच्या सर्व जागांवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. ही सर्व गणिते बघून भाजपने २०१९ मध्ये गिरीश बापट यांच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ घातली आहे. भाजप सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाबाबत गंभीर असून प्रत्येक जागा जिंकायचीच अशी अभिलाषा भाजप बाळगून आहे. म्हणूनच ही जागाही भाजप सर्व ताकदीनिशी लढणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी मात्र या ठिकाणी उमेदवार मिळत नव्हता. या ठिकाणी काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड हे सर्व इच्छुक होते. मात्र पुण्याची सामाजिक रचना पाहून काँग्रेसनेही या ठिकाणी मोहन जोशी यांच्या माध्यमातून ब्राह्मण चेहरा देऊन भाजपला मात दिली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही प्राबल्य आहे. प्रवीण गायकवाड यांचाही जनाधार आहे. या सर्व ताकदीचा मोहन जोशी यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसदेखील या जागेविषयी आशादायी बनली आहे. शुक्रवारी(5 एप्रिल) या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हडपसर येथील लक्ष्मी लान्स येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अशा प्रकारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या ठिकाणी विशेष लक्ष देऊन असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, याच लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनीही उमदेवारी अर्ज भरला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाधव यांनी मिरवणुकीला प्रारंभ केला. या वेळी ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष लियाकत खान, भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, वसंत साळवे उपस्थित होते. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. एमआयएमच्या ताकदीमुळे पुण्यातील मुस्लीम मतदार काँग्रेसच्या वाट्याला किती येतील, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. तसेच भारिप बहुजन आघाडीमुळे दलित मतांमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात १९५१ ते २०१४ पर्यंत कायम स्थित्यंतर पहावयास मिळाले आहे. १९५१ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या पुणे मतदारसंघात १९५७ मध्ये प्रजा समाजवादी पार्टीने विजय मिळवला होता. अशा प्रकारे पुढे प्र्रत्येक एक आड एक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जिंकत राहिला आणि संयुक्त समाजवादी पक्ष, भारतीय लोक दल यांचाही उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात जिंकला. १९९१ पासून मात्र या ठिकाणी एकदा भाजप आणि एकदा काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकत गेला. २०१९साठी या ठिकाणी भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसनेही मोहन जोशी हा ब्राह्मण चेहरा या ठिकाणी दिला आहे.

First Published on: April 5, 2019 4:02 AM
Exit mobile version