राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आरक्षण गेलं, बावनकुळेंनी दिला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आरक्षण गेलं, बावनकुळेंनी दिला आंदोलनाचा इशारा

संग्रहित छायाचित्र

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार झोपेत आहे. केवळ सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आरक्षण गेले असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे. आता ओबीसी आंदोलनासाठी आंदोलन करुन राज्य सरकारला झोपेतून जागे करणार असल्याचा इशाराच चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक असताना आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही वर येत आहे. ओबीसींच्याच मतांवर सरकार निवडून आले असून या सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारे ओबीसींना आरक्षण दिले होते. यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही राज्य सरकारने लक्ष दिले नाही. राज्यातील महविकास आघाडी सरकार झोपले असून केवळ सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळेच आरक्षण गेले असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने आयोगाची स्थापना करावी, तीन महिन्यात अहवाल तयार करुन सर्वोच्च न्यायालयात सादर करा तसेच एका महिन्याच्या आतमध्ये आयोगाची स्थापना करा. ओबीसी आरक्षण हा राज्याचा विषय आहे त्यामुळे यामध्ये केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही यामुळे राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

राज्य सरकार ओबीसींच्या मतावर सत्तेत आले आहे. परंतु ओबीसींवर अन्याय करतंय हा राज्य सरकारचा दुटप्पीपणा आहे. या भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

अमोल मिटकरींवर खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. औरंगजेबला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे त्याप्रमाणे चंद्रकांत पाटलांना स्वप्नात अजित पवार दिसतात यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी काव्य करण्यात माहीर आहेत त्यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्या एवढी उंची नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

First Published on: May 30, 2021 2:19 PM
Exit mobile version