देव, महापुरुष आणि बॅचलर… चंद्रकांत पाटलांचा नवा दावा

देव, महापुरुष आणि बॅचलर… चंद्रकांत पाटलांचा नवा दावा

पुणेः आपला कुठलाच देव किंवा महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सर्व करता येतं, असे वक्तव्य करुन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन वादाला निमंत्रण दिले आहे. पूर्वी मुले मुलींची टिंगल करायचे आणि आता तर मुली मुलांची टिंगल करतात, असेही पाटील म्हणाले आहेत.

पुणे येथे राष्ट्रीय युवा दिवस निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. याआधीही महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. पाटील यांनी त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता तर पाटील यांनी महापुरुषांसोबत देवांबाबत वक्तव्य करुन चर्चेला नवीनच विषय दिला आहे.

या कार्यक्रमात पुढे ते म्हणाले, पूर्वी मुले मुलींची टिंगल करायचे आणि आता तर मुली मुलांची टिंगल करतात. स्वामी विवेकानंद यांचा विचार जे आत्मसात करतात ते समाजासाठी काहीतरी करु शकतात.  हिंदू हा एक विचार आहे. हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. आपल्या देशावर कितीतरी आक्रमणं झाली, मुस्लिम, इंग्रज, डच आले काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला आणि जगवला. नाहीतर सगळ्यांची सुंता झाली असती.

पुढे ते म्हणाले, इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायाला लागलो. आपली संस्कृती विसरलो. मुघलांनी आपल्या देवांवर हल्ले केले. मात्र आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीही लपवल्या. मुघलांनी मुलींचा चेहरा कुणी पाहू नये म्हणून घुंगट आणले. पण आता तिला बाहेर काढा. तिला शिकू द्या.

जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचे रक्त हिरवे किंवा निळे आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो, असेही पाटील यांनी सांगितले.

 

First Published on: January 13, 2023 4:32 PM
Exit mobile version