फडणवीस हे कधीच असत्य बोलणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

फडणवीस हे कधीच असत्य बोलणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

मुंबईः खोटे बोलून राजकारण करणे हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही. जे घडले ते त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी जे काही सांगितले ते सत्यच सांगितले, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

अजित पवार यांच्यासोबत पहाटे झालेल्या शपथविधीची कल्पना शरद पवार यांना होती याचा पुर्नउच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे फडणवीस यांच्या बाजूने उभे राहिले. ते म्हणाले, जे फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत त्यांचा इतिहास आणि फडणवीस यांचा इतिहास बघितला तर फडणवीस हे खरंच बोलत आहे हे स्पष्ट होते. मी फडणवीस यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. खुर्ची वाचवण्यासाठी किंवा खुर्ची मिळवण्यासाठी ते असत्य बोलणार नाहीत. नेहमी सत्याने वागण्याच्या स्वभावाने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गंगाधर फडणवीस यांचे संस्कार त्यांच्यावर आहेत. त्यामुळे ते कधीही असत्य बोलणार नाहीत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने फडणवीस यांचे नुकसानच झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा सांगितले होते की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील. निवडणूक झाल्यानंतर तिकडचे दरवाजे बंद झाले, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी कधीच विरोधी पक्षनेत्यांवर सूड काढला नाही. उलट त्यांनाच दगा झाला, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस असे वक्तव्य करतील असे वाटले नव्हते. मात्र त्यांनाही शरद पवार यांच्याशिवाय कोणाचाच आधार नाही. त्यांच्या पक्षातील लोक त्यांना कुठेच हलू देत नाहीत. त्यामुळे शरद पवार यांचे नाव घेऊन फडणवीस नवनवीन वावड्या उठवत असतात. मुळात फडणवीस यांच्याकडे सहा सहा खात्यांची धुरा आहे. असे असताना त्यांना गॉसिप करायला वेळ कसा मिळतो. मला तर राज्याची चिंता वाटत आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

 

First Published on: February 15, 2023 10:46 PM
Exit mobile version