‘गुगल पे’, ‘फोन पे’चे मिनी स्पीकर देण्याच्या नावाने दुकानदारांची फसवणूक

‘गुगल पे’, ‘फोन पे’चे मिनी स्पीकर देण्याच्या नावाने दुकानदारांची फसवणूक

नाशिक : दुकानाच्या आर्थिक व्यवहारसाठी गुगल पे मिनी स्पीकर देण्याच्या नावाने एका तरुणाने किराणा दुकानदारास ४४ हजारांचा गंडा घातल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली. याप्रकरणी राजेश राजपाल कुसवाह (वय ४८, रा. हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मलिक अमिन मोहंमद हसन इफेदी (वय २१, रा. जोहरा पार्क, अशोकनगर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश राजपाल कुसवाह यांचे हेडगेवार चौक येथे अंकित प्रोव्हिजन जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. कुसवाह हे दुकानावर असताना आरोपी मलिक अमिन मोहंमद हसन इफेदी हा त्यांच्याकडे आला. तुम्हाला दुकानाच्या आर्थिक व्यवहारसाठी गुगल पे मिनी स्पीकर मिळवून देतो, असे त्याने सांगितले. कुसवाह यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपी मलिक याने त्यांच्याकडून सर्व मूळ कागदपत्रे स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो काढून जमा केले. त्यानंतर या कागदपत्रांचा वापर करून आरोपी मलिक याने स्वत:च्या फायद्यासाठी होम क्रेडिट फायनान्स कंपनी येथून ४४ हजार रुपयांचे कर्ज घेतले व ते त्याच्या स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले. आरोपी मलिक याने अनेक लोकांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

फसवणुकीचा प्रकार १ नोव्हेंबर २०२२ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत घडला असून, ज्या वेळेस होम क्रेडिट फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी दुकानदार कुशवाह व तसेच अजून या प्रकरणात फसवणूक झालेले दुकानदारांकडे वसुलीसाठी गेले असता त्यांनी सदर कर्ज हे आम्ही घेतलेले नाही, असे सांगितले. त्याप्रमाणे होम क्रेडिट फायनान्स कंपनीच्या अनेक केस बद्दल अशा प्रकारची फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच होम क्रेडिट कंपनीचे कर्मचारी यांनी आरोपी मलिक याला अजून एक मिनी स्पीकर पाहिजे असल्याचे फोन द्वारे भासवून बोलावून घेतले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दुकानदार कुशवाह व इतर फसवणूक झालेले दुकानदार यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी मलिक इफेदी याला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये अनेक व्यक्तींची भागीदारी असल्याचे प्रथम दर्शनी समजले असून, नेमका किती लोकांचा यामध्ये समावेश आहे आणि किती पैशांची फसवणूक झाली आहे हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.

First Published on: January 11, 2023 1:32 PM
Exit mobile version