देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या?, छगन भुजबळ यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या?, छगन भुजबळ यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

पुणे – शाळेत सरस्वती पूजेची गरजच काय? सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिले? डिग्री, डिप्लोमा काय दिले? त्यांनी शिक्षण दिले असते, तर महात्मा फुलेंना समाजाचा विरोध असूनही महिलांसाठी शाळा का सुरू करावी लागली? त्या काळी ब्राम्हण समाजात केवळ पुरुषांना शिक्षण मिळायचे. तेदेखील महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून मी म्हणतो की शाळेत पूजा करायचीच असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांची केली पाहिजे. या महापुरुषांचे शाळेत फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनीच सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला. सोबतच मी ब्राम्हणांच्या नव्हे तर ब्राम्हण्यवादाच्या विरोधात आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भुजबळांच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना भुजबळ म्हणाले की, राज्यपाल सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाईंसह अनेक महापुरुषांचा अपमान करीत आहेत. एवढे कमी की काय बाबा रामदेव यांनीदेखील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. रामदेव बाबांनी सभ्य भाषेत बोलायला हवे होते, असे त्या म्हणाल्या. म्हणजे ते असभ्य भाषेत बोलले हे सिद्ध झाले आहे. राज्यात कुणाविषयी काहीही बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, त्यांची हिंमत तरी कशी होते, असा सवालही भुजबळ यांनी केला.

भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक ठिकाणी असतो याचा आम्हाला आनंद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान आहे. त्याबाबतही काही दुमत नाही, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत असे घडत नाही. ते दुर्लक्षित असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे लवकरच भिडे वाड्याची अवस्था सुधारण्याबाबत सरकारशी चर्चा करणार आहोत. या वाड्याच्या सुधारणेसाठी सरकारकडे मागणीदेखील करणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

First Published on: November 29, 2022 4:05 AM
Exit mobile version