छगन भुजबळ होम क्वारंटाइन

छगन भुजबळ होम क्वारंटाइन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

राज्यात सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी आणि दिग्गजांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातून आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यालयदेखील सुटले नाही. या कार्यालयातील सहा अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने भुजबळ होम क्वारंटाईन झाले आहेत.

कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून, कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. याआधीही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन्ही नेत्यांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत ठाणे, जुन्नर आणि पुण्यात राष्ट्रवादी नेते, नगरसेवकांना कोरोनाची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

First Published on: September 12, 2020 7:25 PM
Exit mobile version