सृष्टीत वसंत फुलला; केशरी फुलांनी बहरला पळस

सृष्टीत वसंत फुलला; केशरी फुलांनी बहरला पळस

भोकरदन : उन्हाळ्याच्या दिवसांची चाहूल लागताच, फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळसाची पानगळ होऊन लाल रंगाची फुले फुलत आहेत. भांगात धरेच्या शेंदूर सजला, वसंताचा कैफ माळरानी उजला, शिशिराची पानगळ संपत आली की वसंताच्या स्वागतासाठी दूर दूर माळरानी पळसफुले अंगोपांगी बहरून डवरून तोरण लावतात. चराचरात उन्हाची काहिली भरलेली असताना ही शेंदूरफुले मात्र वसंतोत्सव साजरा करत असल्याचे नेत्रदिपक असाच दृश्य सध्या बघायला मिळत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांची चाहूल लागताच, फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळसाची पानगळ होऊन लाल रंगाची फुले फुलत आहेत. ‘पळस’ फुलला म्हणजे ‘वसंताचं’ आगमन झालं असल्याची चाहूल लागते. निसर्गातील सावर, पळस, कडूनिंबाबरोबरच अनेक झाडे फुलू लागतात आणि निसर्गाचा ‘वसंतोत्सव’ सुरू होतो. वर्षभर हिरवंगार पण वसंत ऋतू आला, की याची पानगळ होते. एकही पान झाडाच्या फांदीवर शिल्लक राहत नाही. काही दिवसांतच लालभडक फुलांनी फुलून जातो. निसर्गाची ही रंगपंचमी मनाला भुरळ घालते. विशेष म्हणजे प्राचीन काळापासून पळसाचा औषधशास्त्रात औषध म्हणून उपयोग होतो.

पळसाच्या झाडाचे असे आहे महत्त्व

‘पळसाला पानं तीन’ अशी मराठीत म्हण आहे. पण त्या पानांनादेखील त्रिदेवाचं महत्त्व प्राप्त झालं आहे. पळसाच्या बारीक फांद्या यज्ञात समिधा म्हणून वापरतात. पळसाच्या जंगलातील ‘प्लासीची लढाई’ इतिहासात प्रसिद्ध आहे. पळसाच्या फुलांचा ढग पाण्यात सोडला की, त्याचा भगवा नैसर्गिक रंग तयार होतो. या रंगानेच रंगपंचमी ग्रामीण भागात साजरी होते. शिवाय पळसाच्या बियांचे तेल त्वचेकरिता, डिंक शक्तीकरिता, पानं पत्रावळ्याकरिता, तर पळसाचे लाकूड बांधकामातही वापरण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात पानांचा बहर गळून पडल्यानंतर रानावनातील शेवर आणि पळसाला फुले येतात. त्यामुळे सध्या रानावनात शेवर व पळस एकमेकांजवळ फुलण्याची व लाल आणि केशरी रंगाची जणू स्पर्धाच करत असल्याचे दृष्य बघायला मिळत आहे.

First Published on: February 27, 2023 1:11 PM
Exit mobile version