छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही – जयंत पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही – जयंत पाटील

मुंबई – आम्ही भारतीय संविधानाचा कायमच आदर करतो, यापुढेही आदर आणि पालन कायम करत राहू, मात्र या संविधानाच्या चौकटीचा आधार घेत काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करत असतील तर ते आम्हाला कदापि मान्य होणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इशारा दिलाय.

मराठ्यांच्या इतिहासात महिलांना कायमच सन्मानाचे स्थान देण्यात आले. शिरवळ येथे महिलांचा बाजार भरत असल्याची इतिहासात कुठेही नोंद नाही, मात्र चित्रपटात मुद्दाम संपूर्ण मराठा इतिहासाला बदनाम करण्याच्या हेतूने महिलांचा बाजार भरत असल्याचे दाखवले जात आहे. संबंधित चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांना इतिहासाचे विकृतीकरण मान्य आहे का?, असा सवालही जयंत पाटील यांनी केलाय.

अफझल खान वधाच्या घटनेला पौराणिक नाट्यमयता देण्याचा प्रयत्न केला गेलाय. एका पौराणिक काल्पनिक पात्राचे स्मरण व्हावे, हा यामागे उद्देश आहे. यातून शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करून महाराजांना ‘दैवी’ भासवून माणूस म्हणून त्यांची शक्ती, बुद्धी आणि कर्तृत्व कमी लेखण्याचा प्रयत्न दिसतो, असेही जयंत पाटील म्हणाले. बाजीप्रभू देशपांडे शिवरायांच्या बाबतीत काही नकारात्मक भूमिका घेत असल्याचेदेखील या चित्रपटात दाखवले गेले आहे. अशा खोट्या प्रसंगांचा नेमका उद्देश काय? असा सवाल उपस्थित करतानाच बांदल आणि जेधे घराण्यांचे इतिहासात मोठे योगदान असताना अत्यंत कपोलकल्पित रीतीने बांदल आणि जेधे घराण्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण केवळ शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का होते? इतिहासात रंजक अशा अनेक गोष्टी असताना केवळ शिवाजी महाराजांचा इतिहास रंजक आणि काल्पनिक करण्यामागे काय कारण असावे? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केलाय.


हेही वाचाः दृष्टी कमी झाली, बहिरेपणा आला; तुरुंगात असताना संजय राऊतांना जडल्या व्याधी

First Published on: November 11, 2022 9:57 PM
Exit mobile version