जे. पी. म्हणजे “जबान के पक्के”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नड्डांचे कौतुक

जे. पी. म्हणजे “जबान के पक्के”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नड्डांचे कौतुक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्रातील मतदार संघाची मोर्चेबांधणी करण्यासाठी नड्डा यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. पण याचेच औचित्य साधून मुंबईत युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. जे. पी. म्हणजे “जुबान के पक्के” असे म्हणत शिंदे यांनी नड्डा यांची स्तुती केली. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत पुढे जातोय, असेही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – मोठी बातमी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होणारच, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

युवा शक्ती करिअर शिबिराच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या नावात जे. पी. आहे. जे. पी. म्हणजे “जबान के पक्के”. आणि तुमच्यातील हे वैशिष्ट्य सामाजिक आणि राजकीय जीवनात खूप कमी पाहायला मिळते. तुम्ही महाराष्ट्राच्या तरूण-तरूणींना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आलेले आहात, यासाठी शिंदेनी नड्डांचे अभिनंदन केले. युवा शक्ती ही देश आणि समाज घडवणारी शक्ती आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा युवा शक्तीची ताकद ओळखली आहे. आपल्या युवा पिढीच्या जोरावर आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. आपल्या देशाचे नाव संपूर्ण देशामध्ये अतिशय अभिमानाने घेतले जात आहे, असेही शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

सध्याच्या काळात अनेक देशांची आर्थिक व्यवस्था ढासळत असताना आपण जी 20 चं अध्यक्ष पद भूषवतो आहोत. देशाचं भविष्य याच युवा पिढीच्या हाती आहे. राज्याच्या प्रत्येकाला रोजगार या योजनेअंतर्गत अनेक शिबीरे भरवली जात आहेत. जास्तीत जास्त युवकांना याचा कसा फायदा होईल याकडे सरकारचं लक्ष आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

3 लाख विद्यार्थ्यांना मिळणार नोकऱ्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात जे पी नड्डा हे देखील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून ३ लाख विद्याथ्यांना रोजगार मिळाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, 75 हजार नोकऱ्या एकाच वेळी देण्याचं काम सरकार करत आहे. 2 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम झालं आहे. जून महिन्यात उद्योजकांना आम्ही भेटणार आहेत. पुढे 3 लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं आमचं टार्गेट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कमी पैशांत घेता यावे यासाठी आम्ही काम करत आहोत. शिक्षण देण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. पालिकेच्या शाळेत स्किल डेव्हपमेंट सेंटर सुरू करण्यासाठी MOU झालेत, असंही शिंदेंनी यावेळी म्हटलं आहे.

First Published on: May 18, 2023 1:02 PM
Exit mobile version