पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नंतर त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषत:, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासहित मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचे पाणी शेतात साचल्याने सर्व पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचे झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात 8 ते 30 सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे 90 हजार 47 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतलेला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नंतर त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला केलेल्या आहेत. 20 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पाऊस माघार घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

First Published on: October 19, 2022 6:29 PM
Exit mobile version