ज्या वृत्तीविरुद्ध शाहू महाराज लढले ती वृत्ती संपवण्याचे काम करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्या वृत्तीविरुद्ध शाहू महाराज लढले ती वृत्ती संपवण्याचे काम  करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया आणि सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरदृश्य प्रणालीद्वारे पुणे येथून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराज होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले की, प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. छत्रपती शाहू महाराज हे महामानव होते. महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. असं वाटतं की, त्यांना आणखी आयुष्य मिळालं असतं तर आज राज्याचं चित्र वेगळ असतं. पायाभूत सुविधांच्या बाबतीत नाही तर समाज सुधारणेच्यादृष्टीने वेगळं चित्र असतं.

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना छत्रपती शाहू महाराजांचे १०० व स्मृतीवर्ष साजरं करत आहोत. अस्पृश्यांचा उद्धार, शिक्षण प्रसार, धरणे, वसतिगृहे, कृषी, उद्योग क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे. हा दूरदृष्टी असलेला राजा, आज या कामासाठी वेगवेगळे विभाग आहेत. पण या सगळ्या खात्यांचे काम एका माणसानं केलं असे सांगून  ठाकरे पुढे म्हणाले की,  स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना अनेक राजे होऊन गेले. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले असेही अनेकजण होते. पण शाहू महाराज हे  गादीवर बसलेले राजे नव्हते.  या राजाने सातत्याने दीनदुबळ्यांसाठी काम केलं, त्यांच्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्य वर्गाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी संघर्ष केला. याचा उल्लेख प्रबोधनाकारांनी आपल्या पुस्तकात केला आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले पाहिजेत, ते देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलं ते मार्गदर्शक आहे.

शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असले पाहिजे हे वचन होतं. आज जी वृत्ती दिसते आहे त्याच्याविरोधातच शाहू महाराज लढले. आजोबांकडून जे ऐकले, मी वाचले  त्यावरून दिसतं की छत्रपती शाहू महाराज कोणत्या व्यक्ती विरोधात नव्हते तर वृत्तीविरोधात होते. वंचित वर्गासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं. शिक्षणातील भेदभाव दूर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतांना त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढं जाऊ या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

तर  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारावर राज्य चालत असून प्रत्येक पिढीने शाहू विचारांचा अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचे काम हे डोंगरा एवढे मोठे असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारावरच सामाजिक क्रांती घडली.

छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे काळजी घेणारे, आधुनिकतेचा स्वीकार करणारे  आणि दूरदृष्टी असलेले लोकराजा होते. त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेवून विविध क्षेत्रात विकास घडवून आणला, असेही पवार म्हणाले. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास  आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदाविनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

First Published on: May 6, 2022 3:25 PM
Exit mobile version