युतीच्या पेल्यात रेशीम किड्याचं विष…

युतीच्या पेल्यात रेशीम किड्याचं विष…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि अनेक भाजप नेत्यांना लागलीच सत्तेचा नाही पण शिवसेना स्नेहाच्या आशेचा किरण दिसू लागला होता. सबुरी आणि श्रद्धा ठेवल्यास काही सकारात्मक घडेल असे वाटणार्‍या फडणवीस प्रेमींचा पार विचका करण्याचे काम त्यांच्याच सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनीच केल्याची भावना भाजपच्या नेत्या, पदाधिकार्‍यांमध्ये आहे.

आदित्य ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करणार्‍या अमृता यांच्याबद्दल सेनेत कमालीची संतप्त भावना आहे. त्याचाच भाग म्हणून आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विधानभवन परिसरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून आपला निषेध वजा संताप व्यक्त केला आणि सेना- भाजपमधील दरी वाढल्याचेच संकेत दिले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची पत्नी अमृता यांनी आपल्या सांगितिक कारकिर्दी बरोबरच सामाजिक कार्यात वावरायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकीय आणि सामाजिक मंडळींचे लाडके माध्यम असलेल्या ट्विटरकडे वळवला होता. त्यांच्या आक्रमक आणि कटूपणा येणार्‍या ट्विटरने शिवसेनेप्रमाणेच भाजपच्या नेत्यांनाही अडचणीत टाकण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.

मात्र त्यांनी बुधवारी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘रेशीम किडा’ म्हणून संबोधले आणि शिवसैनिकांनी मिसेस माजी मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले. तर महिलांचा अनवधानाने का होईना फडणवीसांकडून चुकीचा उल्लेख झाल्याने त्यांनी माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आणि अमृता यांचा तीळपापड झाला. त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत ट्विट करुन उद्धवपुत्र आदित्य यांच्यासह ठाकरे कुटुंबीय यांनाही लक्ष्य केले. एरव्ही ‘कमालीचा संयम’ हेच शक्तीस्थान असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मग आपल्या नाराजीची झलक गुरुवारी फडणवीस आणि भाजपला दाखवली.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथदिंडीनंतर सिंहासनाधिष्ठित शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्री उद्धव यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे आदी नेतेही उपस्थित होते. यावेळी पुष्पहार अर्पण करताना ठाकरे यांनी छोट्याशा जागेतही मोठ्या खुबीने फडणवीसांना दुर्लक्षित केले.

पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पायर्‍यांवरुन उतरताना छायाचित्रकारांनी आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा आग्रह करताच ठाकरेंनी दोघांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्या पध्दतीने उभे केले आणि तिथे फडणवीस जणू नाहीतच की काय याचा देखावा असा रंगवला ज्यामुळे उपस्थितांना गेल्या दोन दिवसांत सुरु असलेल्या गोष्टींचाच हा परिपाक असल्याचे कळून चुकले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोबाईलवरील मराठीत विचित्रपणे संवाद साधणार्‍यांवर कोरडे ओढले.

अमृता फडणवीसांच्या ‘रेशीम किडा’ ट्विट वर नागपूर ते मुंबई अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र पाठवून अमृता यांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी विनंती केली आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ आमदाराने अमृता यांनी आपले गायन आणि आपले सामाजिक कार्य सुरु ठेवताना राजकारणाची सरमिसळ करु नये यासाठी प्रयत्न केले तर सगळ्यांच्याच भल्याचे होईल अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

सेनेच्या काही महिला पदाधिकार्‍यांनी अमृता फडणवीसांना धडा शिकविण्याची तयारी केली आहे, मात्र त्यातून त्यांना अनाठायी महत्व मिळू नये यासाठी सत्ताधारी सेना नेत्यांचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर उगारलेले ‘दुर्लक्षास्त्र’ भाजपची चिंता वाढवणारे आणि देवेंद्र यांना अडचणीत टाकणारे असल्याची चर्चा भाजप-सेनेत सुरु आहे.

First Published on: February 28, 2020 6:50 AM
Exit mobile version