‘नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा, काळजी घ्या’

‘नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा, काळजी घ्या’

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी आज, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना आश्वस्त केले. सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. असा संवाद मुख्यमंत्र्यांचा गावकऱ्यांशी साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह स्थानिक आमदारही उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावकऱ्यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी ग्वाही दिली. मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाल्यानंतर ठाकरे हे थेट अक्कलकोटकडे रवाना झाले. तेथील बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. मात्र तत्पूर्वी, गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी पुलावरून नुकसानीची पाहणी न करता थेट गावात, बांधावर येऊन पाहणी करावी आणि तेथील अडचणी प्रत्यक्ष गावकऱ्यांशी बोलून जाणून घ्याव्यात, अशी मागणी केली. जेव्हा मुख्यमंत्री तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी पुलावर जाण्यापूर्वी गावच्या वेशीवर थांबून गावक-यांशी छोटेखानी संवाद साधला.

हेही वाचा –

‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय राज्य शासनाकडे पर्याय नाही’

First Published on: October 19, 2020 12:01 PM
Exit mobile version