मुख्यमंत्री घेणार भाजपच्या सोशल मीडिया ‘टीम’चा क्लास

मुख्यमंत्री घेणार भाजपच्या सोशल मीडिया ‘टीम’चा क्लास

मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीमध्ये देखील प्रचारासाठी सगळ्यात जास्त वापर सोशल मीडियाचा होताना दिसणार आहे. त्यामुळे याच माध्यमातून जनतेपर्यत कसे पोहोचता येईल यासाठी भाजप गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार कामाला लागली आहे. मात्र आता हे काम करत असताना आचार संहितेचे भान लक्षात घेत अधिक काम कसे करता येईल, यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोशल मीडिया टीमची उद्या बैठक बोलावल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ही नुसती बैठकच नाही, तर या बैठकीत मुख्यमंत्री नेमका सोशल मीडियाचा प्रचार कसा सुरू आहे? याचीदेखील माहिती घेणार आहेत.

आचार संहितेचा भंग होऊ नये याची घेणार काळजी

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण निवडणूक काळात आचार संहितेचा भंग न करता प्रचार अधिकाधिक कसा करता येईल याचेदेखील धडे या बैठकीत देण्यात येणार आहे. या बैठकीला भाजपाचे सगळे प्रवक्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी काही नव्या कल्पनावर देखील काम करता येईल का? यावर देखील चर्चा होणार आहे.

विरोधकांवर भाजपची सोशल टीम पडणार भारी

सध्या भाजपाची सोशल मीडिया एवढी कामाला लागली आहे की, विरोधकांच्या प्रत्येक टीकेला भाजपाच्या सोशल मीडियाटीम कडून जसाश तसे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे जशी निवडणुकीची तारीख जवळ येईल, तसा सोशल वॉर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या सैनिकांना सज्ज राहण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली, असेच म्हणावे लागेल.

First Published on: March 13, 2019 9:27 PM
Exit mobile version