ठाकरे सरकार की मेहता सरकार!

ठाकरे सरकार की मेहता सरकार!

महाविकास आघाडी सरकार कोण चालवतयं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता… प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनाही सापडलेलं नाही. पण, मातोश्रीपुढे बोलणार कोण? तोंड दाबून बुक्क्यांचा मार! पण, तीन चाकाच्या ठाकरे सरकारमधील दोन चाकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेले साडेसहा महिने बुक्क्यांचा मार सहन केला.‘नया है वह…’ असं गोड मानून तीन चाकाची गाडी चालू ठेवली. पण, हे सरकार उद्धव ठाकरे चालवत नसून अजोय मेहता आपल्या तालावर नाचवतात, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केल्याने काही तरी गडबड सुरू आहे, असं दिसू लागलंय.

विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री अजोय मेहता यांच्या स्टाईल ऑफ वर्किंगविरोधात बंडाचं निशाण घेऊन उभे राहिले असून आम्हाला ठाकरे सरकार हवंय, मेहता सरकार नकोय…असा आवाज द्यायला त्यांनी आता सुरुवात केलीय. मातोश्रीने याची आताच दखल न घेतल्यास या सरकारवरील अस्थिरतेचे ढग पावसाच्या काळ्या ढगासारखे गडद होतील आणि त्यामधून नाराजीचा वर्षाव होईल.

मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे काय जादूची कांडी आहे की ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चालतात आणि आता आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही चालतात. चर्चा तर सुरू आहे : मेहता ठाकरे यांना सोबत घेऊन पुढे जात नाही तर हाताला धरूनच पुढे नेतायत… याआधी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही विश्वासू होते. आठवून बघा ऊर्जा खाते कोण चालवायचे ते. अजितदादा की मेहता? जिथे जाऊ तेथे राहू नाही तर चिटकून बसू!

मुंबई महापालिकेत मेहता यांना आयुक्तपदी आणल्यावर गावात एकच चर्चा सुरू होती साहेब, शिवसेनेचीही कोंडी करणार. पण, साहेब मातोश्रीच्या परीक्षेत नुसते पास नाही, तर मेरिटवर पास! हुशार विद्यार्थी सापडल्याने मातोश्रीवर आनंदी आनंद झाला. आता मेहता यांना म्हणे एकदा नव्हे दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळणार असल्याने युवराजही म्हणे चक्रावलेत.

मेहता यांची मुख्य सचिवपदाची मुदत ३० सप्टेंबर २०१९ ला संपली. पण, त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाली. ती मुदत ३१ मार्च २०२० ला संपली. मुख्य सचिव निवृत्त होणार असे वाटत असताना करोनामुळे मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली ती ३० जून २०२० रोजी संपणार आहे. तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळण्यासाठी मेहता प्रयत्नशील असल्याने त्यांच्या पाठोपाठ रांगेत असलेले वरिष्ठ सनदी अधिकारी संतप्त झालेत…महाराष्ट्र बनाना रिपब्लिक आहे का? असा त्यांचा सवाल आहे. पण, तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता असल्याने मेहता हे कदाचित माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार… हा विक्रम मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

First Published on: June 14, 2020 7:15 AM
Exit mobile version