…आणि वडिलांचा मृतदेह दुचाकीवरुन नेण्याची आली वेळ

…आणि वडिलांचा मृतदेह दुचाकीवरुन नेण्याची आली वेळ

जगात करोनाने अक्षरश: थैमान घातले असून या करोनाची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी देशात लॉकडाउन केले आहे. मात्र, याचा फटका अनेकांना बसला आहे. या लॉकडाउनमुळे रुग्णवाहिका देखील उपलब्ध नसल्याने एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलांना दुचाकीवरुन वडिलांचा मृतदेह नेहण्याची वेळ आली आहे.

नेमके काय घडले?

कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका कुटुंबातील लडका देवजी वावरे (६०) यांना २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्याचे सांगून कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी घरी सोडले. मात्र, घरी असताना दोन दिवसांनी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना दुचाकीवरुन रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने नाइलाजाने त्यांच्या दोन्ही मुलांनी मोटारसायकलवरुन मृतदेह घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप धोंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मयत रुग्णाला विषारी साप चावला होता, मात्र, उपचारानंतर ते बरे झाले होते. त्यांना इतर आजार असण्याची शक्यता असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल’, असे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – Corona Update: करोना निगेटिव्ह व्हायचंय, आयुष्यात निगेटिव्ह होऊ नका – उद्धव ठाकरे


First Published on: March 27, 2020 10:00 PM
Exit mobile version