Coronavirus : चिंचपोकळीचा ‘चिंतामणी’ महाराष्ट्राच्या मदतीसाठी आला धावून!

Coronavirus : चिंचपोकळीचा ‘चिंतामणी’ महाराष्ट्राच्या मदतीसाठी आला धावून!
“खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या शिकवणीप्रमाणे धार्मिक उत्सवातून समाजावर प्रेम करून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ १०० वर्षे जनसेवा करीत आले आहे. त्यामुळेच मंडळाने देशावर आलेल्या संकटसमयी सेवाभावी वृत्तीने मदतीचा हात पुढे केलेला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळामार्फत जमा झालेले ३ लाख ५१ हजार रूपये असा एक अल्पसा हातभार म्हणून ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड १९’ या निधीसाठी धनादेशाद्वारे संबधित खात्यात जमा केले आहे. 

डेटॉल साबण व सॅनिटायझरचे वाटप

तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मंडळाच्यावतीने कोरोनाची माहिती व घ्यावयाची काळजी या संबधीचे माहिती पत्रक सोबत डेटॉल साबण व सॅनिटायझरचे वाटप मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांच्या हस्ते नगरसेविका सिंधूताई मसुरकर, मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत, भालेश परब, अतुल केरकर व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चिंचपोकळीतील इमारतींमध्ये घरोघरी करण्यात आले. तसेच २०१९ मध्ये मंडळाने पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी ५ लाखांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्ध करून दिला होता. या भयावह परिस्थितीवर आपण सर्वांच्या मदतीने नक्कीच मात करण्याचा आशावाद मंडळाचे सचिव श्री वासुदेव सावंत यांनी व्यक्त केला आहे.
First Published on: April 19, 2020 4:12 PM
Exit mobile version