कुख्यात गँगस्टर्सची मुले अध्यात्माकडे

कुख्यात गँगस्टर्सची मुले अध्यात्माकडे

काळ्या कमाईसाठी रक्तरंजित गुन्हेगारीचा इतिहास घडविणारे, अंडरवर्ल्ड डॉन- ‘दाऊद इब्राहिम’ आणि ‘छोटा शकील’ या दोघांचे पुत्र अध्यात्माच्या वाटेवर आहेत. दाऊदचा मोठा मुलगा मोईन कासकरने मौलवी बनण्यात धन्यता मानली आहे. तर छोटा शकीलच्या एकुलत्या एक मुलगा मोबाशीर शेखने कुराण पठणात रस दाखविला आहे. मुलगा मौलवी झाल्याने काही दिवस दाऊद नैराश्येत गेला होता. आता छोटा शकीलवरही तीच वेळ आली आहे. त्याचा मुलगा हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराण पठणात अव्वल असून तोही अध्यात्माकडे वळला आहे. दाऊद आणि छोटा शकील हे पाकिस्तानच्या आश्रयाला गेले आणि तिथेच स्थायिक झाले आहेत.

दाऊदच्या कुटुंबात अनेक मुले आहेत पण अंडरवर्ल्ड सांभाळण्यासाठी त्यापैकी एकही जण पात्र नाही. तर छोटा शकील याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. एकुलता एक मुलगा मोबाशीरने पाकिस्तानमध्ये मौलवी बनण्याचा निर्णय घेतला. गुन्हेगारी विश्वात त्याला रस नाही. सूत्रांनुसार, छोट्या शकीलच्या दोन्ही मुली विवाहित आहेत. थोडक्यात ‘गुन्हेगारी साम्राज्यातला आपला उत्तराधिकारी कोण?’ हा प्रश्न दाऊद आणि छोटा शकील या दोघांनाही सतावत आहे.


ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये होणार्‍या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षेसाठी खाजगी पद्धतीने प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी २६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज अधिकृत संकेतस्थळावर भरायचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in या वर आपले अर्ज करायचे आहेत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेत स्थळावर अर्ज करायचे आहे. तर २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्जासोबतचे शुल्क अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रावर जाऊन जमा करायचे आहे. या परिक्षेसाठी कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आणि स्वतःच्या फोटोची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी देणे अनिवार्य आहे.


माळशेज घाट वाहतुकीसाठी खुला

कल्याण | दरड कोसळल्यामुळे २१ ऑगस्टपासून बंद असलेला माळशेज घाट अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे घाटामध्ये मोठी दरड कोसळली होती. खबरदारीच्या कारणास्तव या घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून दरड हटवण्याचे काम सुरू होते. आता काम पूर्ण झाल्यानंतर हा घाट पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दाट धुके आणि मुसळधार पाऊस यामुळे दरड हटवण्यात अडथळे निर्माण झाले होते.

पर्यटकांना घाटात थांबण्यास मनाई

विकेंडमध्ये निर्सगाचा आनंद घेणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र घाटात धोकादायक परिस्थिती असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना माळशेज घाटात थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश महसूल विभागाकडून देण्यात आले आहेत.

…तर होणार कारवाई

खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या ठिकाणी जाणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहने वेगाने चालविणे, परिसरात मद्यपान करून प्रवेश करणे, मोठमोठ्याने संगीत लावणे, महिलांची छेडछाड असे प्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


भारतीय नौदलाची ताकद वाढणार

दिल्ली । भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांनो सावधान! कारण देशाच्या नौदलाच्या ताकदीमध्ये आणखीन वाढ होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी ४६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून नौदलासाठी १११ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे १५० तोफखाना बंदूक प्रणाली देखील खरेदी केली जाणार आहे.
४६ हजार कोटी रुपयांपैकी २१ हजार कोटी हेलिकॉप्टर खरेदीसाठी खर्च केले जाणार आहेत. लष्करासाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा निर्णय डीएसी अर्थात संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीमध्ये नुकताच घेण्यात आला.
याविषयी बोलताना, डीएसीनं १११ हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली. त्याकरता २१ हजार कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. संरक्षण मंत्रालयाने धोरणात्मक भागीदारीअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ’मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला चालना देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यावेळी नौदलासाठी १११ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार आहे. याकरता २१ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. तसेच हेलिकॉप्टर व्यतिरिक्त लष्करासाठी १५५मिमीच्या १५० तोफखाना बंदूकांची देखील खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान, या बंदुका भारतामध्येच तयार केल्या जातील. तसेच, आखूड टप्प्यातील क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी देखील मंजुरी दिली गेली आहे. मागील अनेक दिवसांपासून ही खरेदी प्रलंबित होती. पण, यामुळे मात्र नौदलाच्या ताकदीमध्ये वाढ होणार हे नक्की.


रक्षाबंधननिमित्त जादा बसेसचे नियोजन

नवी मुंबई । दिनांक 26/08/2018 रोजी रक्षाबंधन सणानिमित्त नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांना जास्तीत जास्त बस सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे. याकरता सकाळी वेळ 10.30 ते रात्री वेळ 21.30 या दरम्यान 40 ते 50 जादा बसेसचे शेडयूल तयार करण्यात आले आहे. या बसेस आवश्यकतेनुसार विविध बस मार्गांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याकरता उपक्रमाच्या तीनही बस आगारातून पर्यवेक्षकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा लाभ प्रवाशी जनतेने घेण्याचे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.


मुंबई- गोवा महामार्गावर शिवशाही बसला अपघात

मुंबई | गोवा महामार्गावर लोणेरे येथे शिवशाही बसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये जिवीतहानी झाली नाही. रस्त्याच्या कडेला बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. राज्य परिवहन मंडळाची ही बस दापोली येथून पुण्याकडे निघाली होती. लोणेरे गावाजवळ ही बस पोहचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला बस पलटी झाली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी ताबडतोब माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


स्वाईन फ्ल्यू आणखी एक बळी

पिंपरी-चिंचवड । शहरामध्ये स्वाईन फ्ल्यूची धास्ती वाढली आहे. गेल्या दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे झाला आहे. तर गेल्या अकरा दिवसांत या आजाराचा हा चौथा मृत्यू आहे.आकुर्डीच्या ५६ वर्षाच्या पुरुषाचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २०१७ मध्ये जानेवारी पासून डिसेंबरपर्यंत ६१ जणांचा स्वाइन फ्ल्यूने बळी घेतला होता. सद्य स्थितीला एकूण ८ जण या आजाराचे बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

First Published on: August 26, 2018 3:00 AM
Exit mobile version