तुळजाभवानी देवीच्या मंदिर गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी

तुळजाभवानी देवीच्या मंदिर गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी

तुळजाभवानी मंदिर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.

तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडाप्रकरणी सदस्य डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केसरकर बोलत होते. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व जामदार खान्यातील अति प्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या- चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार व गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली असून समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआडी) मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी 2001 ते 2005 या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दरोडा टाकून सात लाख 10 हजार रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम व दोन हजार किंमतीचा संगणक मॉनिटर चोरुन नेल्याप्रकरणी प्राप्त फिर्यादीवरुन ठाणे ग्रामीण पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी फरार आहेत. अटक आरोपींकडून तीन लाख 78 हजार आठशे सहा रुपये रोख रक्कम, दोन मोटार सायकली, हत्यारे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. या चर्चेत रवींद्र फाटक, प्रा. जोगेंद्र कवाडे, गिरीष व्यास, डॉ. मनिषा कायंदे, आदींनी सहभाग घेतला.

First Published on: June 21, 2019 4:52 AM
Exit mobile version