केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे?

केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे?

केडगाव हत्याकांड

केडगावमध्ये झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडाच्या प्रकरणाचा तपास योग्य रितीने केला जात नाही, असा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेरीस जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करून तपास यंत्रणेत बदल करून वेगाने तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांचे उपोषण मागे

महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 7 एप्रिल रोजी सायंकाळी केडगाव परिसरात शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे या 2 कार्यकर्त्यांची गोळ्या घालून तसेच तलवारीने मारहाण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्याकांडाच्या घटनेला सव्वा महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकरणाचा तपास वेगाने व योग्य पध्दतीने केला जात नसल्याचा आरोप करीत मृत संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या नातेवाईकांनी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही उपोषण सुरूच राहिल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना उपोषणाची माहिती दिली. त्यावेळी केसरकर यांनी उपोषणकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपास यंत्रणेत बदल करून तो वेगाने केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.

दरम्यान, दुहेरी हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भानुदास कोतकर याला पुणे येथे अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. हत्याकांडापूर्वी भानुदास कोतकर व प्रत्यक्ष खून करणारा संदीप गुंजाळ यांची पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे भेट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच माजी उप महौपार सुवर्णा कोतकर यांच्याशी फोनवर आपले बोलणे झाल्याची कबुली स्वत: कोतकरने पोलिसांकडे दिली आहे. अशोक लांडे खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर कोतकरला वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र जामिनावर बाहेर असतानाच कोतकरने पुन्हा तशाच प्रकारचा खुनाचा गुन्हा केला असल्याने पोलिसांनी त्याच्या विरूध्द भादंवि 303 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: May 17, 2018 11:18 AM
Exit mobile version