सिव्हिल ः आयसीयू, तात्कालीक कक्ष होणार ६० बेड्सचा

सिव्हिल ः आयसीयू, तात्कालीक कक्ष होणार ६० बेड्सचा

गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि तात्कालीक कक्षातील (अपघात कक्ष) खाटांची संख्या २० वरुन ६० होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरासह परराज्यातून येणार्‍या रुग्णालयांना अतिदक्षता विभागात गोल्डन अवर्समध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह अतीमहत्वाच्या सुविधा मिळणार आहे. अपघातासह अतिगंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आपत्कालीन कक्ष कुंभमेळा इमारतीमध्ये स्थलांतरीत केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्नसंख्येत वाढ होत आहे. दिवसभरात नाशिक शहरासह जिल्हाभरातून दीड हजारहून अधिक रुग्ण उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात येतात. यामध्ये अनेक रुग्णांना गोल्डन अवर्समध्ये उपचार मिळणे गरजेचे असते. सध्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन कक्षात प्रत्येकी १० खाटा आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मर्यादित खाटा असल्याने अनेक रुग्णांना खाटांची प्रतिक्षा करावी लागते. शिवाय, रुग्णाला बेड्स उपलब्ध होत नसल्याने त्याच्यावर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना अनेक अडचणींना सामोरे लागते. ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांना समजली. त्यांनी रुग्णालयातील वॉर्डांची पाहणी केली असता त्यांनाही रुग्णांच्या तुलनेत खाटांची संख्या अपुरे असल्याचे लक्षात आले. जिल्हा रुग्णालय ७०० खाटांचे असून, मुख्य इमारतील येणार्‍या रुग्णांना वेळेत खाटा उपलब्ध होण्यासाठी डॉ. शिंदे यांनी आता अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन कक्षात आता ६० खाटा असणार आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी दिली दुरुस्तीची सूचना

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्यासमवेत जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन कक्ष, औषध भांडार विभाग, कुंभमेळा इमारतीची पाहणी केली. मुख्य इमारतीमधील काही वॉर्ड कुंभमेळा इमारतीत स्थलांतरीत करण्याचे नियोजन सुरु आहे. कुंभमेळा इमारतीतील लिफ्टसह इतर दुरुस्तीची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना दिली.

जिल्हा रुग्णालयात येणार्‍या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळाला पाहिजे. प्रत्येक रुग्णाला गोल्डन अवर्समध्ये खाट उपलब्ध व्हावी, यासाठी अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन कक्षातील खाटांची संख्या ६० केली जाणार आहे. लवकरच दोन्ही विभाग शिफ्ट केले जातील.
– डॉ. चारूदत्त शिंदे
जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

First Published on: December 8, 2023 3:54 PM
Exit mobile version