दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट, ‘या’ संकेतस्थळावरून करता येईल डाऊनलोड

दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट, ‘या’ संकेतस्थळावरून करता येईल डाऊनलोड

10 class Exam Hall Ticket | मुंबई – दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परीक्षेला अवघा एक महिना उरलेला असताना हॉल तिकिट (Hall Ticket) मिळाले नव्हते. मात्र, आता हॉल तिकिटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकिट उपलब्ध होणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हॉल तिकिटाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, 2 मार्चपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 6 फेब्रुवारीपासून हॉलतिकिट मिळणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी हॉल तिकिट डाऊनलोड करू शकतील. 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे.

लेटलतिफ विद्यार्थ्यांना दणका

परीक्षा केंद्रांवर उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. ११ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर साडेदहा वाजता हजर राहणे अनिवार्य आहे. तर, दुपारी तीनच्या परीक्षेसाठी अडीच वाजता हजर राहणे बंधनकारक आहे. दिलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार आहे. पूर्वी दहा मिनिटांची सूट होती. परंतु, विद्यार्थ्यांकडून या सवलतीचा गैरफायदा घेण्यात आला होता.

कॉपी बहाद्दरांवर करडी नजर

परीक्षा कॉपीमुक्त होण्याकरता शिक्षण मंडळाने पावलं उचलली आहे. कॉपी करताना पकडल्यास विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी खास अधिकारीही नेमण्यात आले आहेत, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांवर करडी नजर असणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

First Published on: February 3, 2023 8:29 PM
Exit mobile version