भाजपमध्ये मेगाभरती नाही – देवेंद्र फडणवीस

भाजपमध्ये मेगाभरती नाही – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पक्षामध्ये मेगाभरती चालू असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही निवडक नेत्यांना पक्षात प्रवेश देत असून पक्षामध्ये ९८ टक्के नेते मुळचेच असून नव्या नेत्यांमुळे प्रश्न निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर दिले आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, यात्राप्रमुख आणि भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, खासदार विकास महात्मे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके आणि शिरीष बोराळकर उपस्थित होते.

‘सातत्याने शक्तीसंचय केला पाहिजे’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘भाजपामध्ये नेत्यांनी प्रवेश करण्याला मेगाभरती असे नाव माध्यमांमध्ये दिले असले तरी ही महाभरती नाही. ज्यांना विधानसभेत पक्षाची उमेदवारी दिली जाईल अशा चार नेत्यांना आतापर्यंत पक्षामध्ये घेतले असून अजून असे चारपाच नेते समाविष्ट केले जातील. भाजप-शिवसेना महायुतीचा आणि जागांचा विचार करूनच अशा नेत्यांचा समावेश केला जातो. पक्षात मूळ भाजपचे नेते ९८ टक्के आहेत. तर दोन टक्के बाहेरून घेतलेले आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण होत नाही.’ यापुढे ते म्हणाले की, ‘अनेकदा पक्षाची शक्ती वाढते. त्यावेळी आत्मसंतुष्ट होतो आणि विचार करतो की, आता कशासाठी विस्तार करायचा. पण मला वाटते की सातत्याने शक्तीसंचय केला पाहिजे. नेत्यांच्या बाबतीत निवडक व्यक्तींचा समावेश करत असलो तरी कार्यकर्त्यांच्या बाबतीत मोकळेपणाने प्रवेश दिला जातो.’

‘आपण आरश्यात नाही तर लोकांच्या चेहऱ्यात पाहतो’

ते म्हणाले की, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस बी टीम होत असून वंचित बहुजन आघाडी ए टीम होत आहे, असे आपण काल सांगल्यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल केला की, आपण ज्योतिषी आहोत का. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची हवा संपली आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सामान्य माणसालाही समजते की या पक्षांच्या पाठीशी उभे रहायला कोणी तयार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आरश्यात पहावे. आपल्याला त्यांना सांगायचे आहे की, आपण आरश्यात नाही तर लोकांच्या चेहऱ्यात पाहतो आणि लोकांच्या चेहऱ्यात जे दडले आहे, ते आम्हाला दिसते. आरश्यात पहायची वेळ कोणावर आली आहे, हे सांगायची गरज नाही.


हेही वाचा – महाजनादेश यात्रा Live : अमित शहा सोलापूर विमानतळावर दाखल

First Published on: September 1, 2019 5:32 PM
Exit mobile version