मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना दुष्काळी भागातील दौऱ्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना दुष्काळी भागातील दौऱ्याचे निर्देश

महाराष्ट्र राज्य मंत्रालय

राज्य मंत्रीमंडळाची आज, गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दुष्काळ भागातील पालकमंत्र्यांना दिले. शिवाय त्या त्या भागातील पालकमंत्र्यांना दौरे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली असून गडचिरोली नक्षल हल्ल्याचा घटनाक्रम आणि पुढील कारवाईबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. पोलिस महासंचालक मुंबईत परत आल्यावर प्रदिर्घ बैठक पार पडणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री गडचिरोली रवाना होणार म्हणून दिलेल्या वेळेच्या आधी बैठक घेण्यात आली.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

दुष्काळाचा आढावा आज घेण्यात आला. १२११६ गावांमधे ४७७४ टॅंकर्स देण्यात आले आहेत. १२६४ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यात ७ लाख ४४ हजार मोठा जनावरं आणि जवळपास १ लाख लहान जनावरं म्हणजे जवळपास साडे आठ जनावरं आहेत. मोठ्या जनावरांना ९० आणि लहान जनावरांना ४५ रुपये दर देण्यात आला आहे. चाऱ्याची उपलब्धता ५८ हजार हेक्टर जमीनीवर आहे. दुष्काळाकरता जी थेट मदत करतो ती ८२ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांना खात्यात मिळाली आहे, ४४१२ कोटी रुपये त्यात देण्यात आले आहेत. तर ३२०० कोटी रुपये विम्याचे देण्यात येणार आहेत, त्यातले ११०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. व्हेरीफिकेशन करण्यासाठी थांबलो आहोत. बाकी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पैसे देण्यात आले आहेत.

दुष्काळ आढावा घेताना आचारसंहीतेची अडचण नाही 

पाण्याचे टॅंकर्स औरंगाबाद विभागात पाहायला मिळतायंत. जायकवाडीत मृतसाठा वापरला जात आहे. पण तिथे मृतसाठा भरपूर आहे. त्यामुळे ते पाणी आत्ता वापरता येईल अशी परिस्थिती आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही. आम्ही आज निर्देश दिले आहेत की पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांचा आढावा घ्यावा. त्यांनी चारा छावण्यांचा आढावा घ्यावा, पाण्याच्या टॅंकर्सना जीपीएस लावण्यात आलंय त्यामुळे त्यांनी त्याचीही पडताळणी करावी. आपण २०११ चा लोकसंख्येचा निकष न लावता २०१८ चा लोकसंख्येचा निकष पाण्याच्या टॅंकर्सचा निकष मानावा. राज्यात २ लाख ७२ हजार मजूर मनरेगावर काम करतायंत. ९१ टक्के मजूरी वेळेत दिलीये. स्थलांतरण रोखण्यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त अन्नधान्य आणि शालेय पोषण आहार देतोय. अल निनोमुळे पाऊस थोडासा उशीरा येईल ही शक्यता आमची चिंता वाढवणारी आहे. पूर्व किनारपट्टीवर येणा-या चक्रीवादळामुळे तापमान कमी होईल आणि पाण्याची समस्या थोडी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

First Published on: May 2, 2019 1:41 PM
Exit mobile version