मुख्यमंत्र्यांचं ऑनलाईन दुष्काळ निवारण

मुख्यमंत्र्यांचं ऑनलाईन दुष्काळ निवारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, त्याला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनास दिले. कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने माण-दहिवडी, खटाव, फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली. सुमारे पंचवीस सरपंचांशी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी. असे आदेश यावेळी मु्ख्यमंत्र्यांनी दिले.

रोहयोअंतर्गत जिल्ह्यात ३८५ कामे सुरू

जिल्ह्यातील अकरा पैकी माण-दहिवडी, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमधील १८३ गावे व ७७० वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण २१९ टँकर सुरु आहेत. सर्वाधिक माण तालुक्यात 107 तर सर्वात कमी सातारा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.

टँकर्सची संख्या

माण- १०७, खटाव- ३७, कोरेगाव- ३१, फलटण-२५, वाई-६, जावळी- ३,महाबळेश्वर-३,पाटण- २, कराड-२, खंडाळा-२,सातारा २१९

सातारा जिल्ह्यात २० शासकीय चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून त्यामध्ये मोठी जनावरे १६ हजार ९८४ व लहान जनावरे ३ हजार १६५ अशी एकूण २० हजार १४९ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ३ तालुक्यातील ३१० गावातील १ लाख ३५ हजार ७३२ शेतकऱ्यांना ४१.९३ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ४७ हजार १६७ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी २.४२ कोटी इतकी रक्कम ६ हजार २७८ पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३.४८ लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ५५ हजार शेतकऱ्यांना २००० रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण ११ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

 

पुणे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना –

•   आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर या ७ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषीत करण्यात आला आहे.

•   पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांमधील ११६ गावे व ९८८ वाड्या आणि वस्त्यांमध्ये  सद्यस्थितीत १९६ टँकर सुरु आहेत. त्यापैकी बारामती ३७, पुरंदर २६, आंबेगाव २५, दौंड २२, जुन्नर १९, शिरुर १९, इंदापूर १४, हवेली १०,खेड ८, मुळशी ८, भोर ४ आणि वेल्हे ४ असे एकूण १९६ टँकर सुरु आहेत.

•   पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पुणे जिल्ह्यात आज अखेर ५१२ विंधण विहिरीद्वारे,५२ नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करुन, १० तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करुन व ५७ विहिरींचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

•  पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु.७.७५ कोटी इतकी विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. व सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला आहे.

•   पुणे जिल्ह्यात एकूण ३ शासकीय चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत. त्यात अद्याप जनावरे दाखल नाहीत. सेवाभावी संस्थांच्या २ छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये १३५ जनावरे दाखल आहेत.

•   पुणे जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ७ तालुक्यातील ८३७ गावातील १ लाख ७२ हजार ५५३ शेतकऱ्यांना रु.६६ कोटी ४३ लाख इतकी रक्कम वाटप केलेली आहे.

•  पुणे जिल्ह्यातील एकूण १९ हजार ०३९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. ६ कोटी ४६ लाख अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु.६ कोटी ४४ लाख इतकी रक्कम ८ हजार ४१५ शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

•  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील २.५५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३८ हजार शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे पहिला हप्त्यापोटी एकूण रु. ७ कोटी ५० लाख इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम सुरु आहे.

•  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात ७२८ कामे सुरु असून त्यावर २ हजार ६३७ मजूर उपस्थित आहेत. सर्वात जास्त ५१० मजूर इंदापूर तालुक्यात असून सर्वात कमी ३४ मजूर जुन्नर तालुक्यात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये ७ हजार ९४५ कामे शेल्फवर आहेत.

First Published on: May 13, 2019 5:29 PM
Exit mobile version