बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही; मुख्यमंत्री शिंदे-अनिल परब यांच्यात जुंपली

बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही; मुख्यमंत्री शिंदे-अनिल परब यांच्यात जुंपली

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावर विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान बॅटींग केली. परंतु ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदेंनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला. बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांच्यात सभागृहातच जुंपली.

अनिल परब यांनी सीमा प्रश्न वादावर आणि मुख्यमंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी अनिल परब म्हणाले की, सीमा प्रश्नावर घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदेंनी राजकीय फटकेबाजी केली. आज त्यांच्या कर्तृत्वावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाहीये. त्यांनी ज्या प्रकारे कामगिरी केली आहे. त्याप्रमाणे त्यांची ३३ देशांत दखल घेण्यात आली. ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. मी कुठलंही राजकीय भाषण करत नाही. आपण ५० लोकं घेऊन गेलात आणि सरकार स्थापन केलं. त्यातला एक जरी पडला, तरी राजीनामा देईन, हे तुमचं वाक्य आहे. १३ खासदार आणि ५० आमदारांची आपण जबाबदारी घेतली. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे, असं अनिल परब म्हणाले.

फक्त एकच हात जोडून विनंती आहे की बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की, पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही तुमच्या जिवावर आम्हाला हरवलंत, तर आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण भाजपाच्या मदतीने आम्हाला हरवणार असाल तर आम्हाला वाईट वाटेल, असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील परबांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही निवडून आलात, तेव्हा यांचीच मदत तुम्हाला लागली. जे खासदार आणि आमदार तुमच्याकडे उरले आहेत. त्यावेळी मोदी साहेबांचे फोटो लावलात. ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात, त्या दिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला.


हेही वाचा : नक्षलवाद्यांचा बिमोड करून सुरजागड प्रकल्प सुरू केला – मुख्यमंत्री एकनाथ


 

First Published on: December 28, 2022 6:14 PM
Exit mobile version