ठाकरे आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये उलटले ‘खोके’!

ठाकरे आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये उलटले ‘खोके’!

मुंबई : शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे चिडलेल्या ठाकरे गटाने प्रत्येकी 50 खोके घेऊन हे बंड केल्याचा आरोप केला. आता ठाकरे गटाकडूनही हाच आरोप होत आहे. (Cm Eknath Shinde and Uddhav Thackeray Maharashtra Mumbai)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बाजूला सारले, असे सांगत शिंदे गटाने ‘उठाव’ केला. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ, असे सांगत बंडखोर आमदारांनी अगदी सुरुवातीला पॅचअपची भूमिका घेतली होती. त्याचवेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना माफिया म्हटले होते. त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत सोमय्यांना इशारा दिला होता. उद्धव ठाकरे यांचा आदर राखला जावा, अशी आमची भूमिका असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले होते.
खोक्यांचा वाद हा केवळ ठाकरे आणि शिंदे गटापुरता मर्यादित राहिला नाही. तर, सत्ताधारी भाजपा आणि शिंदे समर्थकांमध्येही हा वाद रंगला होता. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी 50 खोके घेतल्याचा आरोप भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांनी केला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.

पण दुसरीकडे ठाकरे गटाकडून बंडखोरांचा उल्लेख कायम ‘खोके’वाले म्हणून करण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदे गटानेही देखील त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काल दीपक केसरकर यांनी हा राग व्यक्त केलाच. “एक दिवस या सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा कळेल की खोके कोणाकडे गेले आणि खोके भरून पैसे कोणाकडे गेले ते सुद्धा एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि फ्रीजचा बॉक्स भरून कोणाकडे काय गेले हे देखील सांगू,” असे दीपक केसरकर म्हणाले.

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी तर, उद्धव ठाकरे यांनी सीआयडीसह विविध यंत्रणा लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा, असे प्रतिआव्हानच दिले आहे. याशिवाय, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो लपूनछपून करत नाही. काही लोक लपूनछपून करतात. परंतु अशी कामे उजेडात येतात. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? आता मी शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अशा प्रकारे ठाकरे गटाने उचललेला ‘खोक्यां’चा मुद्दा आता शिंदे गटाने उलटवण्यास सुरुवात केली आहे.


हेही वाचा – ‘यांच्या’ अंगावर एकतरी केस आहे का?, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

First Published on: November 27, 2022 10:43 PM
Exit mobile version