नाशिक लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री घेणार निर्णय

नाशिक लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री घेणार निर्णय

नाशिक शहर लॉकडाऊन करण्याबाबत राजकीय पुढार्‍यांमध्ये मतभेद असल्याने आता याबाबत अंतीम निर्णय दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. या संदर्भात ते स्वत: येत्या दोन ते तीन दिवसांत नाशकात दाखल होणार असून पालकमंत्री छगन भूजबळ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. या बैठकीअंती निर्णय जाहीर करण्यात येईल.
नाशकात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रारंभी दोन ते तीन रुग्ण शहरात आढळून येत होते. आता मात्र दररोज सुमारे २०० ते २५० रुग्ण आढळून येतात. जुने नाशिक, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड यांसह शहरातील बहुतांश भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे येथे अत्यावश्यक सेवा वगळता व्यवसाय करण्यास मज्जाव आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहरात लॉकडाऊन करावे अशी आग्रही मागणी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. पालकमंत्री छगन भूजबळ यांनी मात्र लॉकडाऊन करु नये अशी भूमिका घेतली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: दोन ते तीन दिवसांत नाशकात दाखल होणार आहेत. यावेळी ते पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील नामांकीत डॉक्टर्स व अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन ते लॉकडाऊनसंदर्भात निर्णय जाहीर करतील.

 

First Published on: July 17, 2020 6:25 PM
Exit mobile version