‘किती दिवस असं जगणार, पुनर्वसनाची मागणी करा, आपण करु’; मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्तांना आश्वासन

‘किती दिवस असं जगणार, पुनर्वसनाची मागणी करा, आपण करु’; मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्तांना आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुराचा फटका बसलेल्या नृसिंहवाडी गावाला भेट देत शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी भेट संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना पुनर्वसनाची मागणी करा, आपण पुनर्वसन करु, असं आवाहन ग्रामस्थांना केलं. दरम्यान, मुख्यमंत्री आल्याने गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे पोलिसांना गर्दी आवरणं कठीण झालं होतं.

शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहणाऱ्या एका महिलेशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, आम्ही ती मागणी मंजूर करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. “गाव म्हणून सर्वांनी एकत्र बसा. आमची पुनर्वसनाची तयारी आहे, असं लेखी स्वरुपात द्या मग आम्ही ते करु. हे दरवर्षी असं होणार…आम्ही तुम्हाला भेटत राहणार. तुम्ही अशा पद्धतीने राहणार. तुमचं घरदार वाहून जाणार. हे असं आयुष्य नाही जगायचं…तुमचं पुनर्वसन त्यावरचा इलाज आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना अद्यापही कोरोनाचं संकट आहे अशी आठवण करुन देताना मास्क लावायला विसरु नका असं आवाहन केलं.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी १० च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर शिरोळ-नृसिंहवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पुढे शाहूपूर, गंगावेश, शिवाजी पूल रस्ता आणि आसपासच्या भागात पुरामुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री पाहणीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

First Published on: July 30, 2021 12:18 PM
Exit mobile version