पुन्हा लॉकडाऊन ही अफवाच

पुन्हा लॉकडाऊन ही अफवाच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

करोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर ठिकठिकाणी गर्दी उसळत असल्याने राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करणार ही केवळ अफवा असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.गेल्या दोन- तीन दिवसांपासून सोशल मीडियावर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर ठाकरे यांनी खुलासा केला आहे.

लॉकडाऊनचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणार्‍या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असे ठाकरे म्हणाले.आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही.

बाहेर पडल्यावर कायम चेहर्‍याला मास्क लावणे, साबणाने, जंतुनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल; पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

First Published on: June 13, 2020 7:10 AM
Exit mobile version