मुंबईकरांना गारेगार मेट्रो प्रवास

मुंबईकरांना गारेगार मेट्रो प्रवास

राज्य सरकारने मुंबईकरांना गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाची भेट दिली आहे. शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पश्चिम उपनगरासाठी मेट्रो सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.

मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोतून प्रवासही केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी तिकीट काढून मेट्रो ७ मार्गावर आरे ते कुरार असा प्रवास केला. ही मेट्रो रविवारपासून सर्वसामान्यांसाठी धावणार आहे.

मेट्रोच्या २०.७३ किमीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत खुला करून देण्यात येत आहे. मुंबईकरांसाठी पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या फेर्‍यांमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल. तसेच रस्त्यांवरील वाहनांची संख्याही घटेल असे एमएमआरडीएने म्हटले आहे. एकूण ११ ट्रेन या मार्गावर चालवण्यात येणार असून एकूण १५० फेर्‍या या मार्गावर होतील. डहाणूकरवाडी या स्थानकाहून पहिली ट्रेन सकाळी ६ वाजता तर आरेहून पहिली ट्रेन सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. डहाणूकरवाडीतून शेवटची ट्रेन रात्री ९ वाजता तर आरेतून शेवटची मेट्रो रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल.

असे आहे वेळापत्रक?
मेट्रोकडून एकूण ११ ट्रेन्स मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनला ६ कोचेस आहेत. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या फेर्‍या चालविण्यात येणार आहेत. साधारण ११ मिनिटांनी एक ट्रेन असेल. प्रत्येक ट्रेनची प्रवासी क्षमता २२८० आहे, तर प्रत्येक कोचनिहाय ५० जणांची क्षमता असणार आहे. मेट्रो ट्रेन ताशी ७० किमी वेगाने चालवण्याची परवानगी एमएमआरडीएला मिळाली आहे. तर यापुढच्या काळात ताशी ८० किमी वेगाने ट्रेन चालवण्यासाठी परवानगी मिळू शकते, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एसव्ही.आर.श्रीनिवास यांनी दिली आहे. आगामी काळात मेट्रोच्या ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रो मार्गिकांची वैशिष्ठ्ये?
– ड्रायव्हरलेस ऑपरेशनसाठी ट्रेन डिझाईन करण्यात आल्या आहेत
– सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
– दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रो स्थानकांवर सुविधा
– प्रथमोपचाराची स्थानकांवर सुविधा
– महिलांसाठी विशेष कोच

मेट्रो २ अ स्थानके

१ दहिसर पूर्व
२ आनंद नगर
३ कांदरपाडा
४ मंडपेश्वर कॉलनी
५ एकसर
६ बोरिवली पश्चिम
७ पहाडीएकसर
८ कांदिवली (पश्चिम)
९ डहाणूकर वाडी

मेट्रो ७

१ आरे
२ दिंडोशी
३ कुरार
४ आकुर्ली
५ पोयसर
६ मागाठाणे
७ देवीपाडा
८ राष्ट्रीयउद्यान
९ ओवरी पाडा
१० दहिसर (पूर्व)

First Published on: April 3, 2022 6:09 AM
Exit mobile version