मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा रद्द!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा रद्द!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी १४ जून रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री वादळाचं नुकसान झालेल्या स्थानिकांना मदतीचा वाटप करणार होते. मात्र, मुंबई आणि अलिबागमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक प्रशासन आणि बंदोबस्त चोख ठेवणं क्रमप्राप्त असतं. मात्र, पावसामुळे या सर्व यंत्रणेला या मुसळधार पावसाचा सामना करावा लागला असता. या पार्श्वभूमीवर हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून येत्या काही दिवसांमध्ये या दौऱ्याचं पुन्हा नियोजन केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान झाले असून, या चक्रीवादळाचा फटका हा सर्वाधिक रायगड जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी १४ जून रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर जाणार होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार होते. तसेच चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांच्या नियोजनात नमूद होतं. चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्याचं नियोजित होतं. मात्र, स्थानिक हवामानात झालेले बदल आणि होत असलेला मुसळधार पाऊस, या पार्श्वभूमीवर हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे.

First Published on: June 13, 2020 10:46 PM
Exit mobile version