ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे – मुख्यमंत्री

ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे – मुख्यमंत्री

साकीनाका बलात्कार प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट असल्याचं म्हटलं आहे. गेले चार ते पाच दिवस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील परिस्थितीचा आढावा मी गेले चार पाच दिवसांपासून घेत आहे. कारण हवामान खात्याने जो काही अंदाज व्यक्त केला होता, त्या अनुषंगाने आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. कारण अतिवृष्टीला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत, अतिवृष्टीच्या पलिकडे जाऊन वृष्टी होत आहे. अनपेक्षित असं हे संकट आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरडी कोसळत आहेत, पुराचं पाणी वाढत आहे, नद्या फुगत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. त्यांनीसुद्धा सर्वोतपरी सहकार्य करण्याचं वचन दिलं आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड…एनडीआरएफच्या टीम बचाव कार्य करत आहेत. बचावकार्य सुरु झालेलं आहे. पाऊस काही ठिकाणी थांबतोय तर काही ठिकाणी पडतोय. धरणं आणि नद्या या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे आणि ते कुठं जाईल ते लक्षात घेऊन तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम जोराने सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, हे सगळं करत असताना कोरोनाचं सुद्धा संकट टळलेलं नाही आणि याचीही कल्पना आपल्याला आहे. हाच तो परिसर आहे जिथे कोरोनाचं संकट आपल्याला चिंताजनक वाटतंय. अशा वेळेला पहिल्या प्रथम जिवीत हानी होऊ न देणं हे महत्त्वाचं काम आहे त्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तळीये गावात दरड कोसळल्याने ३०-३५ लोकं दुर्दैवाने मृत्यूमुखी

दुर्दैवाने तळई गावात दरड कोसळल्याने काही जणांना काल वाचवू शकलो. पण आतापर्यंत ३०-३५ लोकं दुर्दैवाने मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. अजून तिथे काम सुरु आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तिथे देखील प्रयत्न सुरु आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोविड रुग्णांची काळजी घ्या

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यात ही आपत्ती आल्याने कोविड रुग्णांची असुविधा होऊ देऊ नका असे सांगून ते म्हणाले की, आरोग्याचे नियम पाळून, विशेषत: मास्क घालून बचाव कार्यातील लोकानी काळजी घ्यावी.

एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

यावेळी बैठकीत एकूण एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याविषयी माहिती देण्यात आली. एनडीआरएफच्या एकूण १४ तुकड्या नेमून दिलेल्या जिल्ह्यांत पोहचल्या असून त्यांची जिलहानीहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे : पालघर १, ठाणे २, रायगड २, रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग १, सांगली १, सातारा १ . कोल्हापूर २,
एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय पोलादपूर करिता एनडीआरएफची १ टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे.
तटरक्षक दलाच्या २ , नौदलाच्या २ तुकड्या रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत.
राखीव तुकड्या अंधेरी येथे – २ , नागपूर येथे १ , पुणे येथे १ , एसडीआरएफ धुळे येथे १ , आणि नागपूर येथे १ अशा तैनात करण्यात आल्या आहेत. आज दुपारपर्यंत एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून येत आहेत .

बचाव कार्य वेगाने

आज सकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार बचाव कार्याव्दारे चिपळूण येथून ५०० लोकांना वाचविण्यात आले.
चिपळूण येथे ४ निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
कोल्हापूर – पन्हाळा रोड येथे पूराच्या पाण्यात बसमध्ये अडकलेल्या २२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
महाड येथे हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरने केलेल्या हवाई पाहणीनूसार पाणी पातळी कमी होताना दिसते.
खेड जि. रत्नागिरी या ठिकाणी भूस्खलनामूळे ७ -८ कुटूंबे बाधीत झाले आहेत. या घटनेत १० व्यक्ती जखमी झाले असून १० ते १५ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या मदतीने शोध व बचाव कार्य सूरू करण्यात आले आहे.
वशिष्टी नदी वरील चिपळूण व मुंबई यांना जोडणारा पूल कोसळल्यामूळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे.
महाड माणगांव येथे 2000 लोकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तांना अन्न व कपडे गरजेनुसार पुरविण्यात येत आहेत.

First Published on: July 23, 2021 2:13 PM
Exit mobile version