…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन – उद्धव ठाकरे

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन – उद्धव ठाकरे

राज्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून केंद्र सरकारच्या अनलॉक १.० नुसार मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आलं आहे. यानुसार रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेनमेंट झोन अशा वर्गवारीनुसार लॉकडाऊन लागू असला तरी त्याच्या नियम आणि अटींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, सध्य ३० जूनपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी इतर मंत्र्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिले आहेत. ‘जर शिथिल केलेले नियम किंवा काढलेला लॉकडाऊन जीवघेणा ठरत आहे असं दिसलं, तर नाईलाजाने लॉकडाऊन पुन्हा वाढवावा लागेल’, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज दुपारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीसोबतच निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, त्यासाठी कोकणातील नुकसानग्रस्त भागाला द्यावी लागणारी मदत आणि पावसाळी अधिवेशनाची निश्चित तारीख या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राज्याचं पावसाळी अधिवेशन २२ जून ऐवजी पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला मदत आणि पुनर्वसनासाठीच्या उपाययोजना देखील जाहीर करण्यात आल्या. यावेळी लॉकडाऊनसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

व्यायाम करायला लोकांची झुंबड!

राज्यात सध्याचा लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चांबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं, ‘आपण टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहोत. कोणतीही घाईगडबड आपल्याला करायची नाही. मिशन बिगीन अगेनमध्ये लोकांना बाहेर जाऊन व्यायाम करण्याची परवानगी आपण दिली. पण ती परवानगी आरोग्य राखण्यासाठी दिली असून आरोग्य बिघडवण्यासाठी दिलेली नाही. ज्या पद्धतीने लोकांनी त्यासाठी गर्दी केली, ते गंभीर असून आपण योग्य ते अंतर राखूनच या गोष्टी केल्या पाहिजेत. राज्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहेच. पण जर असं दिसलं की आपण नियम शिथिल केल्यामुळे हा अनलॉक जीवघेणा ठरू लागला आहे, तर मात्र नाईलाजाने लॉकडाऊन पुन्हा लागू करावा लागेल’.

First Published on: June 10, 2020 4:39 PM
Exit mobile version