अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची १० हजार कोटी मदतीची घोषणा!

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची १० हजार कोटी मदतीची घोषणा!

राज्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानामुळे बळीराजाचं कंबरडं मोडलं होतं. हातातोंडाशी आलेलं पीक पावसानं झोडपून खरवडून नेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या अशा नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, अक्कलकोट या भागात पाहणी करण्यात आली. त्यावेळी नुकसानग्रस्तांना लवकरच मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्याअनुषंगाने आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची माहिती या बैठकीत दिली. यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी भरपाई देण्याकरता राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. तसेच, ही मदत दिवाळीच्या आधीच संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

अशी आपत्ती येते, तेव्हा आपत्तीग्रस्तांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना भक्कम आधार देण्याची आवश्यकता असते. ते सरकारचं कर्तव्य असतं. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आलं त्याच्या आधीपासून अतिवृष्टी झाली होती. तेव्हापासून मदतीची आवश्यकता निर्माण झाली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ३० हजार ८०० कोटी रुपयांची मदत केली गेली. त्यात नैसर्गित आपत्ती, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, कोविड अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. सरकार आल्यापासून ९ हजार ८०० कोटी नैसर्गिक आपत्तींसाठी खर्च झाले आहेत.

केंद्राकडे आम्ही निसर्ग चक्रीवादळाचे १ हजार ६५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. अद्याप ते पैसे आलेले नाहीत. पण राज्य सरकारने ते दिले आहेत. त्यानंतर ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भात पूरस्थिती आली. त्यासाठी ८०० कोटींची मागणी केली. पण त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे राज्याला केंद्राकडून एकूण ३८ हजार कोटी रुपये अद्याप आलेले नाहीत. मधल्या काळात आम्ही त्यासाठी अनेक पत्र-स्मरणपत्र पाठवली. नुकसानभरपाई, अतिवृष्टी याची पाहणी करण्यासाठी केंद्राकडून पथक येतं. राज्यानं केंद्राला २ ते ३ वेळा त्याची आठवण देखील केली. पण ते पथक आलेलं नाही.

पण यासाठी संकटं येण्याची थांबत नाहीत. नुकसान मोठं झालंय. पिकं वाहून गेली आहेत. जमीन खरडून गेली आहे. रस्ते वाहून गेलेत. विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत. त्यासाठी आम्ही सगळ्याचा सारासार आढावा घेतला. या सगळ्या नुकसानासाठी १० हजार कोटींचं पॅकेज देण्याचं आम्ही ठरवलं आहे. पावसात झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी ही रक्कम असेल. नुकसानग्रस्त कृषी आणि घरांसाठी ५ हजार ५०० कोटी रुपये, रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटी, पाणीपुरवठ्यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूज केली आहे. जिरायत, बागायत क्षेत्रासाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर तर फळबागांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाईल.

First Published on: October 23, 2020 2:48 PM
Exit mobile version