रेड झोनमध्ये काटेकोर नियम पाळावेच लागतील – उद्धव ठाकरे

रेड झोनमध्ये काटेकोर नियम पाळावेच लागतील – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हीरकमहोत्सवी दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क साधला. यावेळी जनतेला त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याच वेळी सध्याच्या कोरोनाच्या संकटात जनतेला सहभाग आणि मदतीचं आवाहन देखील केलं. ‘रेड झोन असलेल्या भागांमध्ये नियमांचं काटेकोर पालन करावंच लागेल. तर ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता येईल आणि ग्रीन झोनमधल्या भागांमध्ये हळूहळू नियम शिथिल केले जातील’, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच, ‘कोरोनाची लागण झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, फक्त त्यानं लक्षणं जाणवू लागताच वेळेवर तपासणीसाठी पुढे यायला हवं’, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

लॉकडाऊन म्हणजे सर्किट ब्रेकर!

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं. ‘लॉकडाऊन म्हणजे काही टाळेबंदी नाही. तो गतिरोधक आहे. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्याला सर्किट ब्रेकर म्हटलंय. म्हणजे ही विषाणूंची श्रृंखला तोडणं. नाहीतर या विषाणूंचा झपाट्याने गुणाकार झाला असता’, असं ते म्हणाले. तसेच, ‘जर वेळेवर रुग्ण समोर आले, तर कोरोना बरा होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना ही लक्षणं जाणवली, त्यांनी लागलीच फिव्हर क्लिनिकमध्ये या. व्हेंटिलेटर लावला म्हणजे मृत्यू नाही. व्हेंटिलेटर लावून देखील रुग्ण बरे होत आहेत’, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

‘प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची खरी संपत्ती जनता असते. पैशांपेक्षाही त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. महाराष्ट्रात काही रेड झोन आहेत. तिथे काही करणं आपल्या हिताचं नाही. ऑरेंज झोनमध्ये काही अॅक्टिव्ह केसेस आहेत. तिथे काही गोष्टी आपण करू शकतो. ग्रीन झोनमधल्या अटी हळूहळू आपण काढतोय. परराज्यात ज्यांना जायचंय, त्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण त्यांनी शिस्तीत जायचं आहे. आपल्या परराज्यात अडकलेल्या लोकांनाही इथे आणावं लागेल. शेतीवर कोणतंही बंधन नाही. शेतकऱ्यांना बी-बियाणं, खताची कमतरता राहणार नाही. मालवाहतूक सुरू आहे. हळूहळू बंधनं उठवतोय. पण जर झुंबड झाली, तर बंधनं पुन्हा टाकावी लागतील’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आपण कुठेही कमी पडत नाही आहोत..

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी लोकांना विश्वास दिला. ‘कोरोनाशी लढताना महाराष्ट्र कुठेही कमी पडत नाहीये. कोविड योद्ध्यांचं जे आवाहन मी केलं होतं, त्याला २० हजार लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे आणि १० हजारांच्या आसपास लोकांनी प्रत्यक्ष तयारी देखील दाखवली आहे. मुंबई आणि कडोंच्या महापौरांनी देखील तयारी दाखवली आहे की त्या पुन्हा परिचारिकेची सेवा द्यायला तयार आहोत. पण अजूनही डॉक्टर, क्लिनिक्सनी पुढे यायची गरज आहे’, असं ते म्हणाले.

हुतात्मा चौकात अंगावर रोमांच उठले!

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात गेल्यावर जाणवलेल्या भावना सांगितल्या. ‘हुतात्मा चौकात गेलो, तेव्हा अंगावर रोमांच उठले. मुंबईसाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी वंदन करत होतो. या भावना मी शब्दांत सांगू शकत नाही’, असं ते म्हणाले. ‘ज्यांनी ज्यांनी या संघर्षात बलिदान दिलंय, त्यांना मानाचा मुजरा. आज महाराष्ट्राला ६० वर्ष झाली. सरकार आलं, तेव्हाच हा दिवस अनेक कार्यक्रम करून साजरा करण्याचं ठरवलं होतं. पण कोरोनामुळे ते शक्य झालं नाही’, असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

First Published on: May 1, 2020 1:32 PM
Exit mobile version