उद्धव ठाकरेंच्या ऑफिसमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना मिळणार स्थान!

उद्धव ठाकरेंच्या ऑफिसमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना मिळणार स्थान!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात अर्थात CMO मध्ये खासगी व्यक्तींची ओएसडी अर्थात ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटीवर नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ७ अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ७ अधिकाऱ्यांची ओएसडी म्हणून नियुक्ती करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी खासगी अधिकाऱ्यांऐवजी आयएएस अधिकाऱ्यांना जास्त पसंती दिल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून स्वत: आदित्य ठाकरे यांनी देखील यासंदर्भात काही उच्चपदस्थ आयएएस अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई मिररने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यानुसार, उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात शिवसेना सचिव आणि त्यांचे जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर आणि अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेही प्रक्रियेमध्ये सहभागी!

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये खासगी व्यक्तींची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्त करण्यात आली होती. मात्र, त्या सर्व अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला, तेव्हा त्या सर्व अधिकाऱ्यांवरचा ओएसडी पदाचा पदभार मोकळा करण्यात आला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमध्ये खुद्द आदित्य ठाकरे देखील सहभागी आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा करत असतानाच दुसरीकडे आदित्य ठाकरे काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा – भाजपमध्ये फूट पडणार? एकनाथ खडसेंच्या घरी तावडेंसोबत बैठक!

आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात नाही?

दरम्यान, शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. आदित्य ठाकरेंना थेट मंत्रिमंडळात न घेता त्यांच्यावर महाविकास आघाडीमधल्या समन्वयासंदर्भात काही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

First Published on: December 4, 2019 5:53 PM
Exit mobile version